‘रेमडेसिविर’च्या किमतीचा झोल नक्‍की काय?

जादा छापील किमतीमुळे रुग्णांसह नातेवाईकांची डोळ्यांदेखत फसवणूक


विक्री किंमतीवर निर्बंध आणण्यासाठी शासन पावले उचलणार का?

– हर्षद कटारिया

पुणे – रेमडेसिविर इंजेक्‍शनवरील छापील किमतीमुळे करोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक होत आहे. पण, सर्वच स्तरावर या अत्यावश्‍यक औषधीबद्दल कोणीही शब्द बोलायला तयार नाही. सध्याची स्थिती पाहून शासनाने आता तरी या इंजेक्‍शनच्या किंमतीबाबत तातडीने धोरण ठरवावे, अशी जनभावना समोर येत आहे.

रेमडेसिविर इंजेक्‍शनच्या बॉक्‍सवर 800 रुपयांपासून 5,400 रुपयांपर्यंत छापील किंमत आहे. मात्र होलसेल बाजारात हे इंजेक्‍शन 800 ते 1,500 रुपयांदरम्यानच मिळतात. मग कंपनी इंजेक्‍शन बॉक्‍सवर इतक्‍या पटीने किंमती का छापतात, असे अनेक प्रश्‍न सध्याच्या काळात जनतेला पडले आहेत. मात्र, या किंमतीवर नियंत्रण आणण्याची अधिकार असलेली यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. या स्थितीत रुग्ण आणि त्याचा नातेवाईक भरडला जात आहे.

यापुढे रेमडेसिविर इंजेक्‍शन रुग्णांना गरजेनुसार दवाखान्यातच मिळणार आहे. किरकोळ औषध दुकानातून त्याची थेट विक्री बंद करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍तांनी दिले आहेत. मात्र, रुग्णांना दवाखान्यातून बिले देताना इंजेक्‍शनच्या कोणत्या किंमती बिलात नमूद केल्या जाणार? असाही प्रश्‍न आहे. कारण, काही कंपन्यांच्या इंजेक्‍शनची होलसेल किंमत आणि छापील किंमत यात जवळपास 70 टक्‍के तफावत असूनही, अन्न व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र इंजेक्‍शनची विक्री करताना 10 टक्के सूट द्यावी, असा सूर लावत आहेत.

पण, औषध उत्पादक कंपन्यांची कातडी वाचवण्याचा हा प्रकार कशासाठी? हा प्रश्‍न जनता विचारत आहे. यापुढे कंपनीनेच औषध विकताना त्या किंमतीवर जीएसटी भरावा आणि छापील किंमती कमी कराव्यात, म्हणजे पुढील भ्रष्टाचार थांबेल असेही मत काही जणांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवार पेठेत केमिस्ट असोसिएशनने 4,800 रुपये किंमत असलेले रेमडेसिविर 2,000 रुपयांना विकले. पण, त्याचे कोणतेही बिल ग्राहकांना दिले नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. या प्रकाराबाबत जाब कोण विचारणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

राज्यभरात रेमडेसिविरची साठेबाजी, काळाबाजार यावर आरोप केले जात असताना अन्न व औषध प्रशासनाने अजूनही ठोस पावले उचललेली नाहीत. यामागचे नेमके कारण काय? असे जनता विचारत आहे.

रेमडेसिविरबद्दल थोडक्‍यात
विविध कंपन्यांच्या रेमडेसिविर इंजेक्‍शनची होलसेल किंमत :  800 ते 1,500 रु.
विविध कंपन्यांच्या रेमडेसिविर इंजेक्‍शनची छापील किंमत : 800 ते 5,400 रु.

रेमडेसिविर इंजेक्‍शन देताना कायद्याप्रमाणे विक्रेत्याने बिल देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास तो गुन्हा आहे आणि त्याची चौकशी व्हावी. बिलावर औषधाचा बॅच नंबर टाकणे गरजेचे आहे. राजकीय पक्षाने अशा परिस्थितीत कुपन वाटप करून त्रास देणे चुकीचे आहे. सरकारने रेमडेसिविरच्या किंमतीवर नियंत्रण आणून हे औषध सहजासहजी उपलब्ध होईल, असे पाहवे. पूर्व नियोजन नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
– विजय कुंभार, सुराज्य संघटना


रेमडेसिविर इंजेक्‍शनवर छापील किंमतीबाबत तातडीने रिव्हिजन करून ती कमी करणे गरजेचे आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात छापील किंमती टाकणे चुकीचेच आहे. तसेच या औषधांवरील जीएसटी कमी करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत आहोत.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच.


करोनामुळे परिस्थिती गंभीर असताना काही लोक गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना कुपन देऊन फोटो कसे काढू शकतात? कुपन म्हणजे मंदिरातील प्रसाद वाटला का यांना? शिवाय बिले न देता 2000 रुपये घेऊन रेमडेसिविर इंजेक्‍शन दिलेल्या घटनेबद्दल आम्ही कागदोपत्री सर्व रुग्णांबाबत चौकशीची मागणी करतो. केंद्र सरकारने गरजू लोकांसाठी अल्प दरात औषधे मिळवून देण्याचे काम करावे.
– विशाल शिंदे, मनसे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.