‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना नेमकी काय आहे? याचा कसा होणार फायदा?

One Nation One Subscription | केंद्र सरकारने ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला सोमवारी मंजुरी दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देशातील 1.8 कोटी विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते संशोधन सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने या नवीन योजनेत सध्या ३० मोठ्या आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश केला आहे. येत्या १ जानेवारी २०२५ पासून योजनेचा लाभ घेता येणार आहे.
‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना काय आहे ?
देशभरातील सर्व विद्यापीठांना ‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेत जोडण्यात येणार आहे. सर्व विद्यापीठे आपले संशोधन, जर्नल शेअर करतील जे देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करुन दिले जातील. या योजनेत प्रमुख 30 आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश केला गेला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च-प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांमध्ये त्यांना प्रवेश घेणे अधिकच सोयीचे ठरेल.
या योजनेचा मुख्य उद्देश काय?
शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिके, अनियतकालिके, संशोधन पत्रिका एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेमुळे सर्व सरकारी उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि विकास प्रयोगशाळांना एका केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मासिक वर्गणीची सुविधा मिळणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार असून यासाठी तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास संस्थांसह केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे व्यवस्थापित सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेचा फायदा होईल. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत स्वायत्त आंतर-विद्यापीठ केंद्र, माहिती आणि ग्रंथालय नेटवर्कद्वारे समन्वयित राष्ट्रीय सदस्यताद्वारे प्रवेश दिला जाईल. One Nation One Subscription |
वन नेशन वन सबक्रिप्शन योजना कशी राबवली जाणार?
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनतर्फे वेळोवेळी ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेच्या वापराचे मूल्यमापन केले जाईल. याशिवाय संस्थांमधील भारतीय लेखकांच्या प्रकाशनांचे निरीक्षण देखील करण्यात येईल. या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सर्व सरकारी संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यासाठी राज्य सरकारांना प्रोत्साहन दिले जाईल.
दरम्यान, या योजनेचा लाभ केंद्र किंवा राज्य सरकार, केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास संस्थांच्या व्यवस्थापनाखालील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना घेता येईल. One Nation One Subscription |
हेही वाचा:





