पुणेः शहरात आणि ग्रामीण भागातीन अनेक ठिकाणी गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे नेमके कारण राष्ट्रीय विषाणू संस्थेने एनआयव्ही केलेल्या पाहणी तपासणीतून समोर आले आहे. हा आजार होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणीचं असल्याचा अहवाल एनआयव्हीने दिला आहे. जीबीएस आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, एनआयव्ही व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एनआयव्हीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल सादर करत ही माहिती दिली.
रुग्णसंख्या १६६ वरून १७०
पुणे शहरासह जिह्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १६६ वरून आताची रुग्णसंख्या १७० इतकी झाली आहे. त्यातील ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ६१ रुग्णांवर आयुसीयुत उपचार करण्यात येत आहेत. जीबीएसच्या १७० संशयित रुग्णांपैकी १३२ रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान झाले आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील ३३ रुग्ण आहेत. तर महापालिका समाविष्ठ गावातील रुग्णसंख्या ८६ इतकी आहे. २२ रुग्ण पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात आहेत. २१ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.
टँकरचं पाणीही दूषित: एनआयव्हीचा अहवाल
शहरातील जीबीएसची रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाऊले उचलत बाधित ठिकाणचे सर्वेक्षणावर भर देण्यात आला. बाधित रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने घेतले जात आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या टँकरच्या पाण्यात ई कोलाय कॅालीफॅार्मचे विषाणू आढळून आले आहेत. 15 टँकर भरण्याच्या सगळ्या पॉईंटवरून टँकरने होणारा सगळा पाणी पुरवठा दूषित असल्याचे एनआव्हीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे विचारधीन
या पार्श्वभूमीवर एनआयव्हीने पुणे महापालिकेला यासंबधी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित गावांसाठी छोठा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा विचार महापालिकेने केला आह. धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपयायोजना केल्या जात आहेत.