डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करताना

1994मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट “द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्‌ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख या चित्रपटासाठी आपल्या मुलासह आवाज देणार असल्याने फॅन्ससाठी हा दुग्ध शर्करा योग ठरणार आहे. मागच्या काही काळात आधी बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी मिशन इम्पॉसिबल या हॉलीवूडपटासाठी तर नंतर शाहरुख आणि आर्यन यांच्या “द लायन किंग’ ऍनिमेटेड चित्रपटासाठी केलेल्या व्हॉईस डबिंगची चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र हे व्हॉईस डबिंग नेमकं आहे तरी काय? आणि या क्षेत्रात पुढील संधी काय आहेत यावर प्रकाश टाकणारा आजचा लेख…

डबिंग म्हणजे काय?
एखाद्या चित्रपटाचे अथवा टीव्ही सीरिजचे डायलॉग्ज इमोशन्ससह दुसऱ्या भाषेत “ट्रान्सलेट’ करणं अशी डबिंगची साधी सोपी व्याख्या सांगता येईल. आपल्याकडील टॉलिवूड चित्रपटांचंच उदाहरण घ्या ना ज्या प्रमाणे तामिळ चित्रपटांचे डायलॉग हिंदीमध्ये वदवून घेतले जातात त्यालाच डबिंग म्हणून ओळखलं जातं. मात्र डबिंग हे केवळ चित्रपटांपुरतेच सीमित नसून डबिंगचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. कार्टून, टीव्ही सिरीज, ई-लर्निंग, क्षेत्रांमध्ये डबिंग आर्टिस्टना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं दिसतं.

डबिंग आर्टिस्टला काय-काय करावं लागतं?
वरकरणी जरी डबिंग साधं-सोपं वाटत असलं तरी ते तितकही सोपं नाहीये. डबिंग आर्टिस्टला एखाद्या पात्राला आवाज देत असताना केवळ त्या पात्राला आवाजच द्यायचा नसतो तर त्या पात्राशी पूर्णपणे एकरूप व्हायचं असतं. आवाज देत असलेल्या पात्रासोबत डबिंग आर्टिस्टला हसावं लागतं, रडावं लागतं आणि त्याने दाखवलेले प्रत्येक इमोशन्स आपल्या आवाजातून पुन्हा जिवंत करावे लागतात.

डबिंग आर्टिस्ट बनण्यासाठी कोणते स्किल्स आवश्‍यक आहेत?
तुम्हाला जर डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या भाषेत काम करणार आहात त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असणं अनिवार्य आहे. त्याखेरीज शब्दांचे स्पष्ट उच्चार, योग्य वेळी लीप सिंक करण्याची कला, ही स्किल्स देखील महत्वाची आहेत.

संधी वर्तमानातील आणि भविष्यातील
चित्रपट, कार्टून, टीव्ही सिरीज, ई-लर्निंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, टीव्ही रेडिओवरील जाहिराती अशा अनेक क्षेत्रांमध्ये डबिंग आर्टिस्टला वर्तमानात मोठी मागणी असून सध्याच्या युगामध्ये प्रादेशिक भाषांचे वाढलेले महत्व पाहता या क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत यात शंका नाही.

डबिंग आर्टिस्ट बनण्यासाठी काय कराल
तसं पाहायला गेलं तर डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाहीये या क्षेत्रात काम करायचं असेल तर डबिंग आर्टिस्टला आवश्‍यक असणारी स्किल्स आत्मसात करावी लागतील. इंडियन व्हॉइस ओव्हर्स, फिल्म सिटी मीडियाझ, फिल्मीट अकॅडमी, आरके फिल्म आणि मीडिया अकॅडमी या संस्था डबिंग क्षेत्रात प्रशिक्षण पुरवतात.

– प्रशांत शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.