नवी दिल्ली – आपल्याजवळही एकदा मस्त आयफोन असावा असं बहुतांश मोबाइलप्रेमींचं स्वप्न असतं, पण आयफोनची किंमत पाहिली की ते स्वप्न हवेत विरतं. पण हे फोन महाग असले तरी आपल्या देशात त्याचा मोठा ग्राहक आहे. आयफोन भारतात स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील ओळखला जातो. दरम्यान, आता याच अॅपलने भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
अॅपल आता आपल्या आगामी आयफोन11ची निर्मिती भारतात करणार असल्यामुळे आपल्या देशात प्रथमच आयफोनची निर्मिती होणार आहे. अशी माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे आता आयफोनच्या नावातील ‘आय’ चा उल्लेख इंडिया असणार हे नक्कीच.
दरम्यान, भारतात तयार होणाऱ्या या फोनची निर्मिती चेन्नईत केली जाणार असून त्याचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. या आयफोन 11ची निर्यातही केली जाऊ शकते. त्यामुळे अॅपलच्या निर्णयामुळे चीनलाही मोठा धक्का बसणार आहे. आयफोन SE च्या निर्मितीचा विचार बंगळुरू येथील विस्ट्रोन प्लांट येथे सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.