नवी दिल्ली : तुम्हालाही कॅब बुक करण्यासाठी स्वतंत्र ऍप असण्यात समस्या येत असेल तर आता तुमची समस्या दूर झाली आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सऍपवरूनच कॅब बुक करू शकता. उबर (Uber) आणि व्हॉट्सऍपने भागीदारी जाहीर केली आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही थेट व्हॉट्सऍपद्वारे उबर कॅब बुक करू शकता. येथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फोनवर उबर ऍप नसले तरी तुम्ही व्हॉट्सऍपवरून थेट कॅब बुक करू शकता. तुम्हाला कॅबचा तपशील आणि पावती व्हॉट्सऍपवरच मिळेल.
उबर आणि व्हॉट्सऍपच्या भागीदारी अंतर्गत, पहिल्या टप्प्यात लखनऊमध्ये हे फिचर जारी केले जात आहे. यानंतर तो नवीन वर्षात नवी दिल्लीसाठी प्रदर्शित केला जाईल. सध्या व्हॉट्सऍपद्वारे कॅब बुकिंगची सुविधा फक्त इंग्रजीमध्येच मिळू शकते,मात्र भविष्यात ती इतर भाषांनाही सपोर्ट करेल. हे फिचर नवीन आणि जुन्या दोन्ही उबर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
* व्हॉट्सऍपवर उबर कॅब कशी बुक करावी?
* सर्वप्रथम, तुम्हाला व्हॉट्सऍपच्या बिझनेस अकाउंट नंबरवर हाय (Hi) हा संदेश पाठवावा लागेल. कंपनीने प्रसिद्धीपत्रकात नंबर बद्दल माहिती दिलेली नाही.
* आता OTP टाकावा लागेल.
* आता तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप ऍड्रेस टाकावा लागेल.
* यानंतर, तुम्हाला Uber Go, Uber Auto, Uber Moto यापैकी एक निवडावा लागेल.
* यानंतर, तुम्हाला कॅबची संपूर्ण माहिती मिळेल, ज्यामध्ये चालकाचे नाव आणि वाहनाचा क्रमांक देखील असेल.