उन्हाळ्यासाठी काय काळजी घ्याल ?

आता हळूहळू गोडगुलाबी थंडी जाऊन मार्च महिन्याच्या उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर आज आपण हा उन्हाळा सुरू होण्याआधीच उन्हाळ्यापासून सुरक्षेची तयारी कशी करून ठेवता येईल याकडे लक्ष देऊ या. उन्हाळ्याच्या दिवसात राग, चिडचिडेपणा याचे प्रमाण वाढते. अशा वेळी रोज कमीत कमी 30 मिनिटे तरी चिंतन प्राणायाम करा. या उपायांना आचरणात आणून आपण उन्हाळ्यातसुद्धा आरामशीर, आरोग्यकारक, सुखी जीवन जगू शकतो. तर मग चला तयारीला लागूया, उन्हाळ्याच्या त्रासावर मात करायला…

उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होते, त्याचबरोबर उपयुक्‍त इलेक्‍ट्रोलाईट्‌ससुद्धा कमी होतात आणि मग स्नायूदुखी, रक्‍तदाबाचे अचानक कमी होणे किंवा वाढणे, चक्‍कर येणे, डोकं दुखणे, थकवा जाणवणे, पायात गोळा येणे, चिडचीड होणे, राग येणे, अतिशय घाम येणे, त्वचेला खाज येणे, संसर्ग होणे असे नानाविध त्रास होतात. फारच जास्त त्रास होऊन उष्माघातसुद्धा येऊ शकतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोज न चुकता 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.
आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे, खासकरून पाण्याचा अंश जास्त असलेली फळे, फळांचा रस, ताक, भाज्यांचा रस, सूप या पदार्थाचा समावेश करा. सकाळची न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण या व्यतिरिक्‍त दर 2 ते 3 तासांनी नाश्‍ता म्हणून वरील यादीतील पदार्थाचा वापर करावा. यामुळे शरीरातील उष्णता आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत होते.

न्याहारी हा दिवसाचा पहिला आहार असल्याने या आहारात सर्वांत प्रथम फळे आणि नंतर प्रथिने असलेल्या अन्नपदार्थाचा समावेश करावा. जसे एक वाटी कडधान्ये आणि 1-2 चपाती व एक कप दूध किंवा 1-2 अंडी आणि 1 चपाती /1-2 काप ब्रेड व एक कप दूध किंवा ओट्‌स, कॉर्नफ्लेक्‍स, व्हिटफ्लेक्‍सबरोबर एक कप दूध आणि थोडा सुका मेवा इ.

दोन्ही वेळेच्या जेवणात चौरस आहार घेण्याचा प्रयत्न करावा. चपाती, भाजी, डाळ, कोशिंबीर आणि थोडासा भात हे सर्व पदार्थ ताटात असावेत. पण उन्हाळ्याच्या दिवसात पापड, भजी, लोणचे असे पदार्थ टाळावेत, त्याऐवजी दही, ताक इ. उष्णता कमी करणाऱ्या पदार्थाचा वापर करावा.

उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ कमी खावेत.
आठवड्यातून एकदा एक ग्लास दुधीचा रस घ्यावा. दुधीभोपळा/कोहळा साल काढून मिक्‍सरमध्ये घालावा, थोडेसे पाणी आणि चवीसाठी थोडे संधव मीठ, लिबू घालावे. हा रस बनवल्याबरोबर ताजाच प्यावा.

उन्हाळ्यात बाहेर जाताना बरोबर एका लहान बाटलीत ओआरएस सोल्युशन / लिंबू सरबत बनवून घ्यावे. उन्हाचा त्रास होऊ लागला तर इलेक्‍ट्रोलाईट्‌सचं असंतुलित प्रमाण ठीक करण्यासाठी याचा फार छान उपयोग होतो.

तसेच 2-4 खजूर बरोबर ठेवावेत. जर अचानक भूक लागल्यासारखे वाटले तर खजूर खाल्ल्याने रक्‍तातील साखरेची पातळी नियंत्रित होऊन उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
रोजचा व्यायाम चालूच ठेवावा. अनेकदा उन्हाळा वाढला म्हणून व्यायामाला सुट्टी दिली जाते, तसे करू नये. जर उन्हाचा त्रास होते असेल तर घरातल्या घरात करण्यासारखे व्यायाम करावेत. व्यायामामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्‍ती वाढते. उन्हाळ्यात उद्‌भवणाऱ्या विकारांवर मात करण्यासाठीही महत्त्वाची असते.

उन्हाळ्यात रोग सहज होतात, तसेच अन्नपदार्थसुद्धा उष्णतेमुळे सहज खराब होतात. त्यामुळे फार काळ उघड्यावर राहिलेले, रस्त्यावरील दुकानातील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

हे सर्व झाले आरोग्यासाठी करायचे उपाय; पण त्याचबरोबर त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.