मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय संकट गडद होत चालले असून यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीची चिंता वाढत आहे. एकीकडे बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी बंडखोरांचे समर्थक देखील रस्त्यावर उतरून त्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसतायेत.
अशातच आसाममध्ये तळ ठोकून बसलेले आमदार तेथून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका मांडत आहेत. काही आमदार तेथून आपक्ल्या कार्यकर्त्यांशी स्वाद साधत असल्याचंही दिसतंय. काही दिवसांपूर्वी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओक्लिपमध्ये गुवाहाटीच्या निसर्गसौंदर्याचे तसेच हॉटेलमधील व्यवस्थेचे खास सोलापुरी भाषेत शहाजीबापूंनी, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के कार्यक्रम’, असं वर्णन केल्याचं ऐकायला मिळालं. शहाजीबाप्पू यांचा हा ऑडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांच्या या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. २० जूनच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या राजकीय नाट्याला आज एक आठवडा पूर्ण होत आहे. या दिवसांमध्ये बंडखोर आमदार दिवसभर काय करतात याबाबत एका नामांकित दैनिकातील पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
पत्रकार सूर्यवंशी यांचा दावा
1.मॉर्निंग वॉक/जिम/स्विमिंग/स्पा
2. न्याहारी
3. चित्रपट, बातम्या पाहणे
4. दुपारचे जेवण
5. डुलकी
6. बैठक/रणनीती
7. चहा
8. मसाज
9. रात्रीचे जेवण
10. संगीत रात्र / मुजरा
11. झोपण्याची वेळ
असा बंडखोर आमदारांचा दिनक्रम असल्याचा दावा पत्रकार सूर्यवंशी यांनी केला आहे. सूर्यवंशी यांना ही माहिती कोठून मिळाली याचा उल्ल्लेख मात्र त्यांनी केलेला नाहीये.