गोव्यातील महाकाय पायाभूत प्रकल्पांबाबत नागरिक काय म्हणतात?

पणजी – गोव्यात येऊ घातलेल्या तीन मोठ्या प्रकल्पांमुळे गोव्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते धास्तावलेले आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रातील या प्रकल्पांमुळे राज्याच्या आरोग्यावर, जैवविविधतेवर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम होईल, असे त्यांना वाटते. आतापर्यंत तरी राज्य सरकारने त्यांचे काहीही ऐकून घेतलेले नाही.

वास्को ते होस्पेट या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, पणजी-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि 400 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी टाकणे या तीन मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मदत केली आहे. मात्र याच प्रकल्पांमुळे राज्यातील जंगलावर जगणारे प्राणी-पक्षांना धोका निर्माण होईल आणि गोव्याला निसर्गाने दिलेले दान धोक्यात येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोलेम जंगलाला युनेस्कोने जगातील आठ जैवविवधता क्षेत्रांपैकी एक म्हणून मान्यता दिलेली आहे. हा परिसर गुजरातपासून खाली कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटाचा भाग आहे. तीन प्रकल्पांमुळे येथील प्राणीजीवन तसेच वनस्पती, फुले, फळझाडे यांना मोठा धोका निर्माण होणार आहे, असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोव्याची राजधानी पणजीपासून पूर्वेला 57 किलोमीटर अंतरावर मोलेम शहर आहे. तिथेच जवळ मोलेम राष्ट्रीय उद्यान आणि 240 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील भगवान महावीर अभयारण्य आहे. अभयारण्यातील वाघांना गोव्यातून कर्नाटकात मुक्त संचार करता येण्याच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील मानला जातो.

अऩेक पक्षी-प्राण्यांना धोका…

1.या परिसरात नोंदी असलेल्या 1,512 प्रकारच्या वनस्पती आहेत. 275 जातींचे पक्षी आढळतात. 48 जातींचे प्राणी आणि 60 प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत.

2.प्राण्यांमध्ये प्रामुख्याने ब्लॅक पँथर, बिबट्या, गवा आणि वाघ यांचा समावेश होतो.

3.केशरी रंगाची मान, काळ्या रंगाचे डोके असणारा पिवळा बुलबुल म्हणजेच हरियाल हा गोवा राज्याचा पक्षी आहे. या पक्षासह, विविध प्रकारचे बेडूक, साप, घुबडे आणि कोळी या जंगलात सापडतात.

कोलेम-वास्को महामार्गाचे चौपदरीकरण

  1. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4-अ च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यातील 13 किलोमीटरचा टप्पा हा आनंद-मोलेम दरम्यानचा आहे. त्यासाठी 12,097 झाडे तोडावी लागणार आहेत.

  2. संरक्षित क्षेत्रातील 31 हेक्टर आणि संरक्षित क्षेत्रात नसलेली परंतु वन क्षेत्रातील 1.9 हेक्टर जागेचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. 31 हेक्टरपैकी 11 हेक्टर जागा कायमस्वरुपी बदलण्यात येणार आहे. बाकीची कामापुरती बदलण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

  3. प्राण्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी 3 भूमिगत बोगदे आणि एक जमिनीवरील बोगदा असेल.

रेल्वेमार्ग दुहेरी करण्याचा प्रकल्प

1) 2035 पर्यंत मडगाव पोर्ट ट्रस्टपासून कर्नाटकातील पोलाद प्रकल्पापर्यंत पाच कोटी दहा लाख टन कोळसा वाहून नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

2)  रेल विकास निगममार्फत होस्पेट-लोंडा, तिनईघाट-वास्को या 352.28 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने 2,127 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

3) हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात होस्पेट ते तिनईघाट हे 252 किलोमीटरचे अंतर आणि दुसऱ्या टप्प्यात तिनईघाट ते वास्को असे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

400 केव्ही क्षमतेची वीज वाहिनी

1) गोवा तम्नार ट्रान्समिशन्स प्रोजेक्टस् कंपनीच्या वतीने हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

2) त्यासाठी 48.3 हेक्टर जागेची गरज आहे. त्याताली 11.5 हेक्टर जागा अभयारण्य क्षेत्रातील आहे.

3)भगवान महावीर अभयारण्यातून 2.51 किलोमीटर अंतराच्या वीजवाहिन्या जाणार आहेत.

सरकार काय म्हणते

1) गोव्याची सध्याची वीजेची सर्वोच्च मागणी 815 मेगावॉट इतकी आहे. 2022 पर्यंत ती 1,192 मेगावॉटवर जाईल.

2) सध्या गोव्याला म्हापसा येथील केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. वीजेची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी वीज वाहिन्यांची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.