पुणेः डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनानंतर उत्सुकता लागून राहिलेल्या पालक मंत्र्याची यादी काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. या यादीत अनेक बदल पाहिला मिळत आहेत. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाली होती. यानंतर पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळाली आहे.
बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून सरपंच देशमुख हत्याप्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती. यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री पंकजा मुंडे यांनी मिळेल, असे देखील बोलले जात होते. पण अजित पवार बीडचे पालक मंत्री झाले आहेत. यावर अजित पवार यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची पोस्ट
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री अजित पवार यांचे नाव जाहीर होताच, शिवसेना ठाकेर गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट लिहून अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही अपवाद वगळता बीडचे पालकमंत्री कायम मुंडे घराण्यातील राहिलेत. मुंडेंचे पारंपरिक विरोधक पवारांच्या घराण्यातील अजितदादाकडे पालकमंत्री जाणे हा कोणता दैवी संकेत म्हणावा? असो, दादा आपले अभिनंदन अन् रक्तरंजित बीडमध्ये हरित बारामती पॅटर्न राबवण्यासाठी शुभेच्छा! असे पोस्टमध्ये अंधारे यांनी लिहिले आहे.
मला पालकमंत्री पदाची जबाबदारी नकोः मंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असे एक्सवरील पोस्टमध्ये मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
आमदार सुरेश धस यांची पोस्ट
आदरणीय अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याचे राजकारण, विकासाचे प्रश्न चांगल्या रितीने ओळखतात. त्यांच्या पालकमंत्री नियुक्तीमुळे विकासात्मक कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही हा विश्वास वाटतो. तसेच बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाबाबत इतर सहकारी आमदारांसमवेत केलेल्या मागणीला स्विकारल्याबद्दल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार..! असल्याचे आमदार सुरेश धस यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.