पुणे – जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी आज इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. हा दौरा विश्रामगृहात न जाता थेट कोविड सेंटर, उपजिल्हा रूग्णालय आणि बाधित व्यक्तींच्या घरांपर्यंत पोहचला. ‘करोना संसर्ग कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले’, सोयी-सुविधा आणि स्वच्छता तर “बाधित व्यक्तीमागे किती लोकांचे कॉन्टॅक ट्रेसिंग केले’, अशी विचारणा करत जिल्हाधिकाऱ्यांनी “ऑन द स्पॉट’ अधिकाऱ्यांची “शाळा’ घेतली.
अधिकाऱ्यांचा दौरा म्हटल्यावर तालुक्याच्या विश्रामगृहात अधिकाऱ्यांना बोलावून दिवसभर बैठका घ्यायच्या. प्रत्येक बैठकीत “तुमच्याकडे काय सुविधा…ठीक आहे यात बदल करा,’ अशा सूचना करायच्या, एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याला झापायचे, चहापाण करायचा आणि विश्रामगृहातून थेट शहरात दौरा संपविणे. मात्र, डॉ. देशमुख यांनी आज या सर्व “शासकीय प्रथा बाजूला ठेवून’ थेट तालुका आणि गावातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि रूग्णांची संवाद साधून प्रत्यक्षातील परिस्थितीचा आढावा घेतला.
पहिल्यांदा इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथील कोविड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी येथील अपुऱ्या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. मीटिंग घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला प्राधान्य द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावाल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. संसर्ग कमी कसा होईल, त्यासाठी जास्तीत जास्त तपासणी, आणि उपाययोजना करा, असा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. बारामती तालुक्यातही त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय आणि पुरंदरमधील कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन सूचना दिल्या.