नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असल्याचे म्हटले जात असतानाच इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन भारत दौऱ्यावर आहेत.
हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अजित डोवाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला होता. पण आता मात्र इराणने हा दावा मागे घेतला आहे.
अब्दुल्लाहियन हे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बुधवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अब्दुल्लाहियन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. अब्दुल्लाहियन यांनी काही भारतीय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. या भेटीत अजित डोवाल यांचाही समावेश होता. भेटीनंतर इराणने प्रसारमाध्यमांसाठी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून संबंधित चर्चेची माहिती दिली होती. त्यानुसार अब्दुल्लाहियन यांनी अजित डोवाल यांच्याकडेही वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
Pleased to meet PM Modi, FM Jaishankar & other Indian officials to advance our bilateral strategic dialogue.
Tehran & New Delhi agree on the need to respect divine religions & Islamic sanctities & to avoid divisive statements.
🇮🇷🇮🇳 determined to bring relations to new heights.
— H.Amirabdollahian امیرعبداللهیان (@Amirabdolahian) June 8, 2022
अजित डोवाल यांनी दोषींना अशी शिक्षा केली जाईल की इतरांनाही धडा मिळेल असे आश्वासन दिल्याचे इराणने म्हटले होते. मात्र आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बेबसाईटवरुन हा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. “द्विपक्षीय धोरणात्मक संबंध वाढवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर आणि इतर भारतीय अधिकाऱ्यांची भेट झाली. तेहरान आणि दिल्ली एकमेकांच्या धर्माचा आदर तसंच इस्लामचं पावित्र्य राखण्यावर आणि द्वेष पसरवणारी वक्तव्यं न करण्यावर सहमत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध अजून दृढ करण्याचा आमचा निर्धार आहे,” असे ट्वीट अब्दुल्लाहियन यांनी केले होते.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एस जयशंकर यांच्यासोबत झालेल्या भेटीत प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भातील विधानाचा मुद्दा चर्चेत आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. “हे भारत सरकारचं मत नसल्याचं आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. संबंधित टिप्पणी तसंच ट्वीट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आमच्याकडे या विषयावर अतिरिक्त सांगण्यासारखं काही नाही,” असे त्यांनी म्हटले.