नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पेट्रोल आणि इंधनावरील एक्साइज ड्यूटीमधून सरकारने आतापर्यंत 16 लाख कोटी रुपये कमावले असल्याची आकडेवारी दिली जाते आहे.
त्यावरून आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. सरकारने या 16 लाख कोटी रुपयांचे काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना राघव चढ्ढा म्हणाले की, एक्साइजमधून आम्ही 16 लाख कोटी रुपये कमवले असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे. पेट्रोल आणि डीझेलवरील उत्पादन शुल्कात सरकारने किती रुपये मिळवले, असा सवाल मी राज्यसभेत केला होता.
त्यालाच सरकारकडून हे उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी 16 लाख कोटी रुपये मिळविल्याचे सांगितले आहे. मात्र, हा पैसा सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांचे कर्ज फेडण्यासाठी वापरला असल्याचा आरोप चढ्ढा यांनी केला. ते म्हणाले की, देशातल्या अनेक राज्यांचे बजेट एकत्र केले तरी 16 लाख कोटी एवढी रक्कम होत नाही. मात्र, सरकारने या एवढ्या मोठ्या रकमेचा उपयोग आपल्या मित्रांची कर्जे फेडण्यासाठी आणि सर्वसामान्य व गरीब माणासांची लूट करण्यासाठी केला.