नवी दिल्ली: अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्यापासून 650 किलोमीटर अंतरावर नोएडा क्षेत्रात बिसारख नावाचे एक गाव आहे. हे गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. या गावात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात 42 फूट उंच शिवलिंग आहे. तसेच 5.5 फूट उंच रावणाची मूर्ती आहे. या गावातील लोक रावणाला महाब्रम्ह असे म्हणतात. या गावात दसऱ्याची दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावण दहनाचा शोक व्यक्त केला जातो.
दरम्यान, या मंदीराचे पुजारी देखील राम नगरीतील भव्य मंदिराच्या पायाभरणीची आतुरतेने वाट पहात आहेत. गौतम बुद्ध नगरच्या बिसारख भागात रावणाचे मंदिर आहे.
पुजारी महंत रामदास म्हणाले, ते 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि हा विधी संपल्यानंतर ते लोकांमध्ये मिठाई वाटप करतील. “जर रावण नसते तर कोणालाही श्रीराम माहित नसते आणि श्रीराम नसते तर जगाला रावणाबद्दल माहिती नसते”, पुजारी महंत रामदास पटीआयशी बोलताना म्हणाले.
महंतांनी सांगितले की, नीतिसूत्रानुसार बिसारखा हे रावणाचे जन्मस्थान आहे. महंतांनी रावणाचे सर्वात ज्ञानी व्यक्ती म्हणून वर्णन केले. सीतेचे हरण केल्यानंतर रावणाने त्यांना राजवाड्यात नेण्याऐवजी अशोक वाटिकामध्ये ठेवले. याशिवाय माता सीतेच्या रक्षणासाठी महिला तैनात केल्या होत्या. जर भगवान राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते तर मला विश्वास आहे की रावण देखील लोकांच्या मर्यादेचा सन्मान करत होते.
महंत रामदास यांनी सांगितले की, रावणाबरोबरच भगवान शिव, पार्वती आणि कुबेरांच्या मूर्तीही मंदिरात ठेवल्या आहेत. मंदिरात येणारे सुमारे 20% भाविक रावणाची पूजा करतात.