Independence Day 2024 | देशात आज 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर राष्ट्राला संबोधित करणार हे त्यांचे 11वे भाषण झाले. यावेळी विकसित भारताच्या दृष्टीने विविध विषयांवर भाष्य केले. तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सेक्युलर सिव्हिल कोड आणि वन नेशन, वन इलेक्शन या मुद्यांवर देखील लक्ष केंद्रीत केले.
सर्व राजकीय पक्षांना केले आवाहन
‘देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी असल्याने आता संपूर्ण देशाने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी मी राजकीय पक्षांना पुढे येण्याचे आवाहन करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.
“भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं, त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे,”असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सेक्युलर सिव्हिल कोड
पीएम मोदी म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेवर अनेकदा चर्चा केली आहे. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असेल. प्रत्येक वर्गाने यावर चर्चा करावी असे मला वाटते. धर्माच्या आधारे फूट पाडणाऱ्या कायद्यांना समाजात स्थान असू शकत नाही.
आता देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असणे ही काळाची गरज आहे. सांप्रदायिक नागरी संहितेत आपण 75 वर्षे घालवली आहेत, आता आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे. तरच धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावापासून मुक्तता मिळेल.”