मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहेत. शिवसेनेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक नेते उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबतच्या सत्तेत सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. आज नार्वेकर यांनी एक ट्विट करत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अशातच, शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मीसुद्धा अमित शहांना शुभेच्छा देते, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय.
तसेच मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज… अशा अफवा ते पसरवत असतात, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलंय.