महाकुंभ 13 जानेवारी 2025 रोजी सुरू होईल, ज्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री होईल. महाकुंभ 45 दिवस चालतो. महाकुंभ हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला कुंभमेळा देखील म्हणतात, महाकुंभ दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रांवरच हा उत्सव आयोजित केला जातो.
प्रयागराजमधील संगम, हरिद्वारमधील गंगा नदी, उज्जैनमधील क्षिप्रा नदी आणि नाशिकमधील गोदावरी नदीवर महाकुंभ आयोजित केला जातो. यावेळी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. या कुंभमेळ्यामध्ये कोणकोणते कोणत्या दिवशी कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असणार त्याबद्दल जाणून घेऊया…
उद्घाटनाच्या दिवशी शंकर महादेवन यांच्या सादरीकरणाने उत्सवाची सुरुवात होईल, तर शेवटच्या दिवशी मोहित चौहान त्यांच्या भावपूर्ण संगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. संपूर्ण महाकुंभात, कैलाश खेर, शान मुखर्जी, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोभना नारायण, डॉ. एल. सुब्रमण्यम, बिक्रम घोष, मालिनी अवस्थी आणि इतर अनेक नामांकित कलाकार या कार्यक्रमात सादरीकरण करतील, ज्यामुळे भाविकांसाठी एक मंत्रमुग्ध करणारे आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल, असे सांस्कृतिक मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कुंभमेळ्याच्या मैदानावरील गंगा पंडालमध्ये शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत आणि नाट्य कला सादर केल्या जातील. ज्याचा उद्देश भक्ती, श्रद्धा आणि भारताच्या सांस्कृतिक समृद्धतेच्या कथा सांगणे आहे, ज्यामुळे भाविक आणि अभ्यागतांना आध्यात्मिक आणि कलात्मक अनुभव मिळतो.
शास्त्रीय संगीतापासून ते लोकपरंपरापर्यंतचे सादरीकरण असेल. ज्यामध्ये रवी त्रिपाठी (२५ जानेवारी), साधना सरगम (२६ जानेवारी), शान (२७ जानेवारी) आणि रंजनी आणि गायत्री (३१ जानेवारी) यांचा समावेश असेल.
उल्लेखनीय सादरीकरणांमध्ये हरिहरन (१० फेब्रुवारी), कैलाश खेर (२३ फेब्रुवारी) आणि मोहित चौहान यांचे समारोप (२४ फेब्रुवारी) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात डॉ. एल. सुब्रमण्यम, तेजेंद्र नारायण मजुमदार आणि तन्मय बोस सारखे शास्त्रीय वादक तसेच आभा गंधर्व आणि पार्थिव गोहिल सारखे लोकसंगीतामधील तारे देखील सहभागी होतील.
12 वर्षांनंतर हा महाकुंभ साजरा होत आहे, ४५ कोटींहून अधिक भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाकुंभादरम्यान, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी भाविक जमतील, ज्याला पापांचे क्षालन आणि मोक्ष (मुक्ती) मिळतो असे मानले जाते. महाकुंभ २६ फेब्रुवारी रोजी संपेल. कुंभाचे मुख्य स्नान विधी (शाही स्नान) १४ जानेवारी (मकर संक्रांती), २९ जानेवारी (मौनी अमावस्या) आणि ३ फेब्रुवारी (बसंत पंचमी) रोजी होतील.