उमेदवारी घोरपडेंना, कदमांना कोणती कमिटमेंट?

सुरेश डुबल
मतदारसंघात चर्चा; भाजपच्या गळाला लागले “धैर्यशील’

कराड  – शिवसेनेसह भाजपने कॉंग्रेसचे कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम यांच्यावर गळ टाकला होता. मात्र यामध्ये भाजपने बाजी मारल्याचे समोर आले आहे. काही दिवसातच धैर्यशीलांचे कदम भाजपकडे वळले आहेत. मात्र निवडणुकीच्या दोन महिने आधीच मनोज घोरपडे यांची चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्याने कदमांना भाजपमध्ये येऊन काय मिळणार? अशी चर्चा मतदार संघात होऊ लागले आहे.

राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ म्हणून कराड उत्तरकडे पाहिले जाते. आ. बाळासाहेब पाटील यांनी मागील निवडणुकीत विजयी चौकार मारला. आता मात्र पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. येथील राजकारणाची दिशा ही बदलली आहे. त्यामुळे कराड उत्तरमध्ये देखील येणाऱ्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे आत्ताच्या परिस्थितीवरून सिद्ध होत आहे.

कराड उत्तरमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा मोठा गट आहे. येथे शिवसेना नाममात्र आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास या निवडणुकीनंतर याठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे. 2014 मध्ये सेना-भाजप वेगळे लढल्याने येथे मोठी चुरस पहावयास मिळाली. मात्र याचा फायदा थेट बाळासाहेब पाटील यांनाच झाला. आता राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. कॉंग्रेसने या मतदारसंघात सपशेल मान टाकली आहे. त्यांचे शिलेदार धैर्यशील कदम हे कॉंग्रेसला रामराम करत सुरुवातीला शिवसेनेत जाण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र, यादरम्यान बऱ्याच घडामोडी घडून अखेर भाजपने यात बाजी मारली आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात उंब्रज येथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांची उमेदवारी ना. चंद्रकांत पाटील यांनी निश्‍चित करून टाकली. ते या आधीपासूनच कामाला देखील लागले आहेत. मात्र ऐनवेळी कदमांचे इन्कमिंग होण्याच्या चर्चेने घोरपडे यांची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. घोरपडे जर भाजपचे उमेदवार असतील, तर धैर्यशील कदम यांना कोणती कमिटमेंट भाजपने केली आहे? हे कळायला मार्ग नाही. काहीही करून विधानसभा लढवणार अशी वेळोवेळी वक्तव्य करून धैर्यशील कदम यांनी आपला गट जिवंत ठेवला आहे. आता मात्र भाजपमध्ये जाऊन जर कदमांनी निवडणूक लढवली नाही, तर कदमांच्या गटाला खिंडार पडू शकते, हे मात्र निश्‍चित.

मतदारसंघावर शिवसेना ठाम 

कराड उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तेही हा मतदारसंघ अन्य कोणाला सोडण्यास तयार नाहीत. उलट काहीही करून कराड उत्तर मतदारसंघ शिवसेनाच लढवणार असा चंगच त्यांनी बांधला असून उंब्रज येथील मेळाव्यात ना. चंद्रकांत पाटील यांनी उत्तर मधून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. यावर ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी ना. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेऊन शिवसेनाच हा मतदारसंघ लढवणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे सेना यावर ठाम असल्याचे दिसते. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोण लढवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून
राहिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.