स्त्रियांमध्ये हृदयविकार कशामुळे वाढतोय?

आशियाई देशांत मधुमेहाने साथीच्या रोगाप्रमाणे उग्र स्वरूप धारण केले असून मधुमेह असणाऱ्या स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्‍यता तीन पटींनी जास्त असते. मधुमेही स्त्रियांमध्ये वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्‍तवाहिन्यांचा विकार होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं. वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्‍तवाहिन्यांचा विकार होण्याची अनुवंशिकता असल्यास स्थूलत्व विशेषत: ओटीपोटाच्या भागात डिस्लीपिडीमिया (रक्‍तातील लिपिड्‌सचे असंतुलित प्रमाण; उदा. ट्रायग्लिसराइड्‌स, कोलेस्ट्रॉल आणि किंवा फॅट फोस्फोलिपिड्‌स) याचा त्रास होतोच. 

धूम्रपान आणि ताण याचा अतिरेक, बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झालेले इस्ट्रोजेनचे प्रमाण आणि इतर आजारांची गुंतागुंत हेसुद्धा स्त्रियांमध्ये सीएडी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. ताणाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दशकांत भारतीय स्त्रियांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात हिरिरीने काम करत आहेत, मात्र घरगुती कामांतून त्यांची सुटका झालेली नाही. त्याच्या जोडीला मुलांच्या मागण्या, न्यूक्‍लियर कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील इतरांचा मर्यादित पाठिंबा या घटकांमुळेही स्त्रियांवरील ताण सातत्याने वाढत आहे.

काम करणाऱ्या स्त्रिया बऱ्याचदा चुकीचा आहार घेतात आणि व्यायाम करत नाहीत. त्यामुळेही भारतीय स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. रक्‍तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. छातीत दुखण्याची जागा, तीव्र थकवा, धाप लागणे, अपचन, जबडा किंवा घसादुखी, पाठीच्या वरच्या भागात दुखणे यांनी घेतली आहे.
रक्‍तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या बहुतेक स्त्रिया उशिरानेच डॉक्‍टरकडे धाव घेतात. या विलंबामुळेच प्राथमिक अँजिओप्लास्टीसारखे उपचार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी प्रमाणात सुचवले जातात. विलंब झाल्यामुळे त्यांच्या रक्‍तवाहिन्यांमधील गुंतागुंतही वाढलेली असते. हृदयविकाराच्या झटक्‍यातून सावरणाऱ्या फार कमी स्त्रियांना हृदयाचे पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जातो.

स्वत:ला वाचवण्यासाठी काय कराल?
हृदयविकाराच्या संभाव्य धोकादायक लक्षणांची माहिती घ्या. मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनाही माहिती द्या.

वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करा. तुमचे वय तीसपेक्षा जास्त असेल, तर स्तनांची तपासणी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे तपासणी करून घेण्याबरोबर हृदयाचे परीक्षणही करून घ्या.

वर सांगितल्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्‍याची लक्षणे तुमच्यात किंवा कुटुंबीयांत दिसल्यास तातडीने वैद्यकीय सेवा घ्या.

लक्षात घ्या. पहिला तास हा सुवर्णतास असतो. या तासाभरात मिळालेला उपचार तुमच्या आरोग्यावर लघु व दीर्घकालीन परिणाम करणारा असतो.

स्वत:ला ताणमुक्‍त करण्याची सवय लावून घ्या.

चांगला आहार घेण्याची सवय लावा आणि धूम्रपान करू नका. घरी तसेच कामाच्या ठिकाणी धूम्रपानमुक्‍त वातावरण मिळावे म्हणून प्रयत्न करा.

हृदयविकाराचा संबंध साधारणपणे मेदयुक्‍त आहाराशी जोडला जातो. तेल-तूप आणि लोणी या पदार्थामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्‌समुळे (संपृक्‍त मेद) हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असे आतापर्यंत समजले जात होते. मात्र, भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने ही समजूत चुकीची असल्याचा दावा केला आहे. हे पदार्थ अनारोग्यकारी असून ते टाळण्यासाठी जारी केलेल्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान दिले आहे.

अलीकडेच केलेल्या नव्या संशोधनात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌च्या सेवनावर नियंत्रण ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्याच प्रकारे ओमेगा-3 किंवा ओमेगा-6 यांसारख्या पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्‌सच्या जास्त वापरामुळेही हा धोका कमी होत असल्याचेही दिसून येत नाही.

ओमेगा-3 किंवा ओमेगा-6 यांसारख्या विशिष्ट फॅटी ऍसिडमधील उपप्रकारांची तपासणी केल्यावर एकाच कुटुंबातील लोकांवर त्यांचे परिणामही वेगवेगळे दिसून आले.

सध्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून आहारासंदर्भात जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, त्यामध्ये आहारांच्या स्त्रोतापेक्षा सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड फॅट्‌सच्या एकूण प्रमाणावर भर दिलेला असतो. नव्या संशोधनामुळे एका नव्या शास्त्रीय वादाला तोंड फुटले आहे.

सध्याच्या आहारविषयक नियमांबाबत नव्याने विचार करण्याची दिशा मिळाली आहे. सन 2008 मध्ये जगात पावणे दोन कोटीहून अधिक लोक या विकाराने मरण पावले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.