आपण पुढे काय पाठवतोय..!

किती वाद करणार आपण? का यासाठीच सुरू आहे सगळे? राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, हे मान्य. मात्र,प्रत्येकाने कुठे, काय अन्‌ कसे व्यक्त होतो याचा किमान विचार करणे आवश्‍यक आहे.कारण आपल्या या अभिव्यक्तीतून असंख्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

विशेषतः व्हॉट्‌स ऍपवर, नेहमी काहीतरी कारण काढून आपापल्या समूहामध्ये वाद निर्माण केले जातात. जीवनाच्या प्रत्येक अंगाला राजकारण स्पर्शून जाते, हे खरे असले तरी किमान ज्या उद्देशासाठी आपल्या समूहाची निर्मिती झाली आहे त्याचा विचार करण्याची गरज आहे. राजकीय चर्चा, या व्हायलाच हव्यात. मात्र, जो पुढारी आपल्याला ओळखतही नाही त्याच्यावरून वादंग निर्माण करून आपण आहे त्या नात्यांना संपवितो! सगळ्यांना एकत्र येऊन भरीव काही करता येईल का, यावर विचार करण्याऐवजी आपले पूर्वग्रहदूषित मतांचे आणि वादांचे प्रदर्शन करून काय साध्य होते?

आपण काय शेअर करतोय याचे किमान भान तरी ठेवले पाहिजे. एक पोस्ट आपण ज्या समूहामध्ये पाठवीत आहोत, ती वाचण्यासाठी त्यातील प्रत्येकाचा 1 मिनिट जरी म्हटले तरी आपण 256 मिनिटे घेतोय, याची किमान जाणीव ठेवावी. काही महत्त्वपूर्ण असेल तर नक्की शेअर करा. मात्र, उगीच कॉपी पेस्ट करण्याच्या नादात भरपूर निरर्थक गोष्टी आपण पुढे पाठवीत असतो. ज्यामुळे असंख्य लोक ग्रुप सोडून जातात आणि ग्रुप म्हणजे काय आयुष्य आहे का?

प्रत्येकाच्या विचारांचा सन्मान व्हायला हवा. उगीच वाद निर्माण करून काहीच साध्य होणार नाही. आधी कोण? यावरूनही खूप काही चुकीची माहिती पुढे पाठविली जाते. माणसांना मरण्याआधी मारले जाते ही आणखी एक शोकांतिका आहे. एम्समध्ये दाखल म्हणजे जणू मृत्यूच! हे भारतीयांनी ठरवून घेतले आहे. कारण एखादा राजकीय नेता उपचारासाठी तिथे दाखल झाला की त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी समाज माध्यमांवर त्याच्यावर उपचार होईपर्यंतसुद्धा थांबले जात नाही.

शेवटी,जी माणसे खऱ्या अर्थाने भरीव काम करतात, ते पण अगदी प्रामाणिकपणे आणि मनामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता; अशा सर्वांसोबत काम करण्याची भावना ठेवली पाहिजे. असे काम करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य केले पाहिजे. समाजसेवा ही काही समाज माध्यमांवर करण्याची बाब नाही. जो योग्य आहे, ज्याची क्षमता आहे, ज्याच्यात दर्जा आहे अशा व्यक्तींना आपण पुढे केले पाहिजे. तरच आपल्या भागाचा विकास होईल अन्यथा हजारो जन्म घेतील अन्‌ इथेच संपतील! मात्र, आपण एकमेकांना पाण्यात पाहण्यात अख्खी हयात वाया घालवू! यातून केवळ द्वेष वाढेल, बाकी काही नाही. ज्यातून कोणाचेच काहीच भले होणार नाही. समाज माध्यमांचा योग्य वापर करीत वास्तवामध्ये काम करण्याची वृत्ती सर्वांमध्ये रूजावी, एवढेच.

-श्रीकांत येरूळे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.