एक लाख लोकांनी एका सेकंदात आंघोळ करणे म्हणजे एक लाख क्‍युसेक पाणी

– श्रीनिवास वारुंजीकर

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील सर्व धरणे आणि बंधारे पुरेपूर भरले आहेत. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडून कित्येक क्‍युसेक पाणी सोडून दिले जात आहे. पावसाळ्यात क्‍युसेक, टीएमसी, 24 इंच पाऊस असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. या पाटबंधारे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत संकल्पना नक्की काय आहेत, हे आपण येथे समजून घेणार आहोत.

एक लाख क्‍युसेक पाणी म्हणजे नक्की किती पाणी?
कोयना अथवा उजनी या विशाल धरणांतून अनेकदा हजारो/लाखो क्‍युसेक पाणी सोडून दिल्याचे आपण ऐकतो. तर एक क्‍युसेक म्हणजे एक घनफूट आकारात मावणारे पाणी. एक घनफूट म्हणजे एखादा डवा 1 फूट लांब, एक फूट रुंद आणि एक फूट खोल असेल, तर त्याला एक घनफूट आकारमान म्हणतात. या आकाराच्या डब्यात/बादलीत साधारणपणे 28 ते 30 लिटर्स पाणी मावते.

एका माणसाला आंघोळीसाठी 15 लिटर्सच्या दोन बादल्या पाणी लागते, असे गृहित धरले तर त्याचा अर्थ एक माणूस आंघोळीसाठी एक क्‍युसेक पाणी वापरतो. याचाच अर्थ एक लाख क्‍युसेक पाणी म्हणजे दोन लाख 80 हजार लिटर्स पाणी होय. हेच वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले, तर एका सेकंदात एक लाख लोकांनी आंघोळ केल्यास जेवढे पाणी वाहून जाईल, तेवढे पाणी म्हणजे एक लाख क्‍युसेक होय.

हेच आणखी वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, पाणी पुरवठा करणारे टॅंकर्स सहसा 12 हजार लिटर्सचे असतात. म्हणजेच एका सेकंदात तुमच्या नजरेसमोरुन एका सेकंदात 12 हजार लिटर्सचे 24 टॅंकर्स निघून गेले तर जेवढे पाणी त्यात असेल, ते म्हणजे एक लाख क्‍युसेक.

आता ही आकडेवारी पहा…
1 फूट x 1 फूट x 1 फूट = एक घनफूट
1 क्‍यूबिक फूट = 28.31 लिटर्स
28.31 लिटर पाणी = दोन बादली पाणी
1 दशलक्ष घनफूट = 1 एमसीएफटी (मिलियन क्‍युबिक फूट) 10 लाख घनफूट
1 टीएमसी = 1,000 दशलक्ष घनफूट (धरणाची पाणी साठवण क्षमता)

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे, म्हणजे किती लिटर पाणी आहे, हे शोधणे रंजक ठरु शकते. धरणाच्या दरवाज्यांमधून पाणी 24 तास सतत 11,500 क्‍युसेक दराने वाहते राहिल्यास धरणातील पाण्याची पातळी 1 टीएमसीने घटते.

मिलिमीटरमध्ये पावसाची गणना का केली जाते?
लोक नेहमी विचार करतात की मोजमापाचे एकक उंची किंवा लांबीशी कसे संबंधित आहे. म्हणजे मिलिमीटर, सेंटीमीटर किंवा इंच मध्ये पावसाची गणना कशी केली जाते? हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुणे येथे पाऊस 15 मी.मी. इतका होता, म्हणजे पावसाच्या पाण्याने मातीच्या थरात वरपासून 15 मिलीमीटरपर्यंत प्रवेश केला. यासाठी आपल्याला जमीन खोदण्याची आवश्‍यकता नाही परंतु ‘रेन गेज सिस्टम’ नावाचे एक साधन पावसाची अचूक माहिती देते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.