मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत असणारा सस्पेन्स अखेर आज संपला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. यादरम्यान त्यांच्या नावावर ३ राजकीय विक्रमांची नोंद झाली आहे. चला तर मग या विक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
1) तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरचा पहिला रेकॉर्ड आहे तो तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये ७२ तास म्हणजेच तीन दिवसांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. यानंतर आता ५ डिसेंबर रोजी ते महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शरद पवारांच्या नंतर तीनदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
2) तीनवेळा १०० हून अधिक आमदार निवडून आणणं
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १०० हून अधिक आमदार निवडून आणले. अजूनपर्यंत ही कामगिरी कोणत्याच नेत्याला जमलेली नाही.
कुठल्या वर्षी भाजपाचे किती आमदार?
२०१४ ची विधानसभा निवडणूक – १२२ आमदार
२०१९ ची विधानसभा निवडणूक – १०५ आमदार
२०२४ ची विधानसभा निवडणूक – १३२ आमदार
3) उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही हा प्रघात मोडला
महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही हा प्रघात देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढला आहे. याचे कारण असे कि याआधी छगन भुजबळ, अजित पवार, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज जे उपमुख्यमंत्री या पदापर्यंत पोहचले पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यामुळे राजकारणात असा प्रघातच पडला होता की उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी हा प्रघात मोडला आहे.