मुंबई – महाराष्ट्रात आज (शनिवारी) ओमायक्रॉन व्हॅरियंटची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबई येथे हा रुग्ण आढळला असून तो आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आला होता. या रुग्णाचे वय ३३ वर्षे आहे.
महाराष्ट्रात सापडलेल्या ‘ओमायक्रॉन’च्या बाधितामध्ये कोणती लक्षणं आढळली?
२४ नोव्हेंबरला मुंबई येथे आलेल्या या रुग्णाला सौम्य ताप आल्याचे जाणवले. या ३३ वर्षीय तरुण रुग्णामध्ये इतर कोणतीही लक्षणं आढळून आली नसून त्याच्यावर सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोव्हीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
या रुग्णाने करोना लस घेतली होती का?
याबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या तरुणाने कोणतीही करोना लस घेतलेली नाही.
संपर्कात आलेल्यांना बाधा?
या रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या १२ जणांची व २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. हे सर्वजण करोना निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण करोना निगेटिव्ह आढळलेले आहेत.
पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय करोना बधितास ओमायक्रॉन नाही
झाम्बिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७.१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.
१ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी करोनाबाधित
मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.