डम्पिंग ग्राऊंडवर काय कारवाई केली- हायकोर्ट

हायकोर्टाने मीरा भाइंदर पालिकेला फटकारले

मुंबई : मीरा भाइंदर मधील बेलकर पाडा येथील टाकण्यात येणाऱ्या बेकायदा कचऱ्या संदर्भात तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. गेली आठ वर्षे या बेकायदा डम्पिंग ग्राऊंडसंदर्भात स्थानिक नागरिक तक्रार करत असताना आता पर्यंत काय कारवाई केली, आतापर्यंत काय कारवाई केली ते दोन दिवसात सांगा, असे न्यायालयाने सुनावले.

मीरा भाइंदर पालिकेच्या हद्दीत बेलकर पाडा येथील आदिवासींच्या भूखंडावर 2011 सालापासून कचरा जमा केला जातो. गेल्या आठ वर्षांपासून येथे जमा झालेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच या ठिकाणी अनधिकृत झोपड्याही उभारण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करूनही माहिती देण्यास मात्र संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. येथील कचरा हटविण्यात यावा तसेच ही जागा पूर्ववत करण्यात यावी, या मागणीसाठी अजय पाठक यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या मीरा भाइंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांना खंडपीठाने चांगलेच फैलावर घेतले. याबाबत संबंधितांना तक्रार करूनही याची दखल का घेतली नाही? मीरा भाइंदर पालिका प्रशासन याला जबाबदार नाही का? अशा शब्दांत न्यायालयाने प्रशासनाचे कान उपटले. या प्रकरणी काय कारवाई केली ? त्याची माहिती दोन दिवसात प्रतिज्ञापत्रावर देण्याचे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.