पुणे – पुणे महापालिकेतर्फे सोमवारपासून घरगुती ओला कचरा दररोज उचलण्यात येणार असून, सुका कचरा एक दिवसाआड उचलण्यात येणार आहे. घरगुती कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची सवय नागरिकांना लागावी, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयामुळे नागरिकांना आता सुका कचरा दोन दिवस घरातच ठेवावा लागणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे ओला, सुका आणि जैविक कचरा असे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत उदासीनता आहे. बहुतांश घरातून सर्रास मिश्र कचरा दिला जात असल्याने, त्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावताना अडचणी येत आहेत.
दंडही आकारला जाणार
त्यानुसार वॉर्ड ऑफिसनिहाय कचरा संकलनाचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. मिश्र कचरा देणाऱ्या नागरिकांना प्रथम 60 रुपये, दुसऱ्या वेळी 120 रुपये आणि त्या पुढील प्रत्येक वेळेस 180 रुपये दंड आकारण्यात येणार असून, त्या अनुषंगाने वॉर्ड ऑफिस स्तरावर कारवाईच्या सूचना दिल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
कचरा प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक
मोठ्या प्रमाणात (दररोज शंभर किलो) कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, पन्नासपेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स-रेस्टॉरन्टना ओला कचरा जागेवरच प्रक्रिया करून जिरवणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित आस्थापनांना कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्या नंतर या आस्थापनांचा ओला कचरा उचण्यात येणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.