वेस्टर्न ड्रेसिंग संसदेचा अपमान की पर्सनल चॉईस?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्‍चिम बंगालमधून मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहॉं या दोन तरुणींनी विजय संपादित करत संसदेत प्रवेश केला. मात्र पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या या दोघींनी संसदेबाहेर जीन्स आणि टॉप असा पाश्‍चिमात्य पेहराव करून फोटो पोस्ट केल्याने देशभरामध्ये त्यांच्या पोषाखाबाबत प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. काहींनी मिमी आणि नुसरत यांच्या पोषाखावरून त्या भारतीय संसदेचा आणि संस्कृतीचा अपमान करीत आहेत अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी त्यांच्या आधुनिकतेचे स्वागत केले. नेटिझन्सने तर सोशल मीडियावर मिमी आणि नुसरत यांच्या पोषाखावरून विचारांचे मंथनच घडवून आणले. सध्या सर्वत्रच चर्चेत असणाऱ्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहॉं यांच्या पोषाखाबाबत युफोरियाच्या वाचकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या असून त्यातीलच काही निवडक प्रतिक्रिया देत आहोत…

कोणी कोणते कपडे परिधान करावे हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. तरिपण ट्रोलर्स ट्रोल का करतात. कारण भारत देश अजुनही बेरोजगार आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे काहीही असो, पण कोणत्या ठिकाणी कोणते कपडे परिधान करावे हे आपल्या हातात आहे. भारत देश हा जगभरामध्ये सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपणच आपल्या सांस्कृतिचा सन्मान करायला हवा.

– रेणुका पवार


प्रत्येक स्त्री पुरुषाला समानतेचे, स्वतंत्रतेचे, हक्क अधिकार दिले आहेत. परंतु हे हक्क, अधिकार आपल्याला दिले असताना त्याचा अयोग्य वापर करणे हे चुकीचे आहे…असे काही करत असताना आपण आपली भारतीय संस्कृती विसरता कामा नये. माझ्या मते संसद भवन हे आपल्यासाठी देवाचं मंदिर आहे.आणि या देवाच्या मंदिराचे पावित्र्य कायम राखायचे असेल तर असा पोशाख घालून जाणे हे योग्य नाही.
– सुरज देवकाते


संसदेत पाश्‍चिमात्य कपडे परिधान केल्याने तृणमूल कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहॉं सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या.ट्रोल होण्याचे कारण कपडे हे होते अशा कारणांमुळे ट्रोल होणे ही चांगली बाब नाही यामुळे आपणच महिलांना पुढे जाण्यापासून रोखत आहेत समानतेचा हक्क असुनही कुठेतरी हक्क पुन्हा हिरावून घेतला आहे अशी भावना निर्माण होत आहे. भारत स्वतंत्र असला तरी आपले मत योग्य ठिकाणी वापरा.
– रोहित डुंबरे


केवळ कपड्यावरून मूल्यमापन न करता संसदेतील उपस्थिती, प्रत्यक्ष कामकाजातील सहभाग, संविधानाचे ज्ञान या गोष्टी संसदपटू साठी महत्वाच्या आहेत. थोडा कालावधी जाऊ द्या, म्हणजे कळेल कि या लोकप्रतिनिधी आहेत कि फक्त अभिनेत्री!
– सुभाष मुळे


खासदार झाले म्हणजे त्या समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे परिधान केले जाणारे कपडे हे आपल्या संस्कृती प्रमाणेच असावे.

– दीपिका जंगम


कोणाच्याही पोषाखावरून त्याच्याबाबत टिप्पणी करणे चुकीचे आहे. आपल्या संविधानाने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केलं असून आपण कशाप्रकारचे कपडे परिधान करायचे याबाबतचा सर्वस्वी अधिकार ज्याचा त्याला आहे. पुरुष खासदार जर संसदेत जीन्स टी-शर्टस घालून जाऊ शकतात तर मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहॉं यांच्या पोषाखाबाबत चर्चा कशासाठी? माझ्या मते या दोन्ही नवनिर्वाचित खासदार आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करीत असून मी त्यांनी परिधान केलेल्या पोशाखाचे पूर्णपणे समर्थन करते!

– प्रियंका गाडे

– ऋषिकेश जंगम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.