कॅरेबियन क्रिकेटचे सुवर्णयुग कालवश

थ्री डब्ल्यूपैकी एक एव्हर्टन विक्‍स यांना जागतिक क्रिकेटची श्रद्धांजली

ब्रीजटाऊन – कॅरेबियन क्रिकेटला जगभरात वर्चस्व मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे महान फलंदाज एव्हर्टन विक्‍स यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. क्‍लाईड वॉलकॉट, फ्रॅंक वॉरेल आणि एव्हर्टन विक्‍स या त्रयीला जागतिक क्रिकेटमध्ये थ्री डब्ल्यू या नावाने संबोधले जात होते.
गेल्या काही वर्षांपासून विक्‍स आजारी होते. बुधवारी त्यांचे बार्बाडोस येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ, आयसीसी, बीसीसीआयसह अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनी तसेच जगभरातील आजी माजी खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1948 साली विक्‍स यांनी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 48 कसोटी सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. 58.61 च्या सरासरीने 4,455 धावादेखील केल्या. 10 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 15 शतके साकार केली. तर 19 अर्धशतके नोंदवली. सलग पाच कसोटी सामन्यात शतके फटकावण्याचा विक्रम त्यांनी साकार केला असून हा विक्रम आजही अबाधित आहे.

प्रथम दर्जाच्या 152 सामन्यांत त्यांनी 36 शतके व 54 अर्धशतके फटकावताना 12 हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. 1958 साली त्यांनी पाकिस्तानविरुद्ध अखेरची कसोटी खेळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ते 1964 सालापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळत होते. 1979 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या दुसऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ते कॅनडा संघाचे प्रशिक्षक होते. 1975 व 1979 साली झालेल्या दोन विश्‍वकरंडक स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजने विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी जागतिक क्रिकेटवर वेस्ट इंडिजचा दबदबा होता, त्यात वीक्‍स यांचेही योगदान मोलाचे होते. निवृत्तीनंतर त्यांनी समालोचक व सामनाधिकारीम्हणूनही काही वर्षे काम केले.

वर्णद्वेषाचा फटका…

1954-55 साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विक्‍स यांनाही वर्णद्वेषाचा फटका बसला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने पार्टीसाठी बोलावलेल्या खेळाडूंमध्ये क्‍लाईड वॉलकॉट, फ्रॅंक वॉरेल आणि एव्हर्टन विक्‍स यांना मुद्दाम आमंत्रित केले नव्हते. या पार्टीत केवळ वेस्ट इंडिजचे श्‍वेतवर्णीय खेळाडूच सहभागी झाले होते. त्यावेळी जागतिक क्रिकेटचे पितामह व ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ व संघ व्यवस्थापनावर टीका केली होती. ब्रॅडमन यांनी या तिन्ही खेळाडूंची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.