#ICCWorldCup2019 : विश्वचषकात आज पाकिस्तान-वेस्टइंडिज आमनेसामने

विजयीमार्गावर परतण्यास पाकिस्तान उत्सुक; वेस्ट इंडिज समोर फॉर्म कायम राखण्याचे आव्हान

स्थळ – ट्रेंटब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
वेळ – दु. 3.00 वा.

नॉटिंगहॅम – विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघांदरम्यान होणार असून लागोपाठ दहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणारा पाकिस्तानचा संघ आजचा सामना जिंकून विजयी मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात असून वेस्ट इंडिजचा संघ गत सामन्यातील आपला फॉर्म कायम राखत विश्‍वचषक अभियानाची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असणार आहे.

गत काही महिन्यांपासून पाकिस्तानचा संघ खराब फॉर्ममधून जात आहे. विश्‍वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर तो त्यांचा लागोपाठ दहावा पराभव होता. त्यापूर्वी त्यांना दुबई येथे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या द्विपक्षीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. तर, इंग्लंड येथे दाखल झाल्यानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या 4 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्यांना 4-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता.

लागोपाठ दोन व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानने विश्‍वचषकासाठी निवडलेल्या संघात काही बदल केले होते. ज्यात त्यांनी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ, मोहम्मद आमिर यांना पुन्हा संघात स्थान दिले होते. मात्र, या दोन्ही गोलंदाजांना संघात वापस बोलावल्यानंतरही अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा सहज पराभव केल्याने पाकिस्तानचा संघ सध्या चांगलाच अडचणीत सापडलेला आहे.

मात्र, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या मते त्यांचा आतापर्यंतचा फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय नसून विश्‍वचषक स्पर्धेत ते सकारात्मक मानसिकतेतून उतरणार आहेत. यावेळी बोलताना अहमद म्हणाला की, गत दोन वर्षांपूर्वी आम्ही इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्या मालिकेपूर्वीही आम्ही आता सारख्याच परिस्थितीतून जात होतो. त्यावेळी ही ऑस्ट्रेलियाने आम्हाला 4-1 आशा फरकाने पराभूत केले होते. तर, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 124 धावांनी आम्हाला पराभूत केले होते. मात्र, तरीही आम्ही त्यातून मार्ग काढून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच प्रयत्न आम्ही यंदाच्या स्पर्धेतही करू, असेही त्याने यावेळी नमूद केले.

तर, दुसरीकडे विश्‍वचषक स्पर्धेत बेभरवशाचा संघ म्हणून वेस्ट इंडिजचा संघ दाखल झाला असला तरी त्यांच्या संघात सध्या ख्रिस गेल, शाई होप, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल यासारखे तगडे खेळाडू असल्याने ते कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला कमी लेखण्याची चूक पाकिस्तानने करू नये. त्यातच सराव सामन्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडसारख्या संघासमोर 422 धावांचा डोंगर तयार केला होता. त्यामुळे सध्या त्यांचा संघ फलंदाजीच्या बाबतीत मजबूत संघ समजला जात असून आजच्या सामन्यात त्यांच्या विजयाची शक्‍यता अधिक आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद अमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शाय होप, एल्विन लुईस, अश्‍ले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here