#CWC19 : वेस्टइंडीज सर्वबाद १४३; भारताचा १२५ धावांनी विजय

मँचेस्टर – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध वेस्टइंडीज या सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर वेस्टइंडियन फलंदाजांची अक्षरशः भंभेरी उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करत वेस्टइंडियन संघापुढे ठेवलेल्या २६९ धावांच्या वाजवी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडियन संघाला धावफलकावर १५० धावा देखील जमवता आल्या नाहीत. वेस्टइंडीजच्या फलंदाजीची मदार असलेला कोणताही फलंदाज आज भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करू शकला नाही. ख्रिस गेल, शिमोरन हेटमेयर, व शाय होप या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांकडून वेस्टइंडीजला चांगल्याच अपेक्षा होत्या मात्र या प्रमुख खेळाडूंनीच स्वस्तात नांगी टाकल्याने शेवट या सामन्यामध्ये भारताने १२५ धावांनी विजय मिळवत सामना आपल्या खिशात घातला.

भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ४, जसप्रीत बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ बळी मिळवला. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या ७२ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा केवळ १८ धावांवर तंबूत परतल्याने कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. कोहली आणि के एल राहुल चांगली खेळी करीत असताना होल्डरने राहुलला वैयक्तिक ४८ धावांवर असताना त्रिफळाचित करत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मैदानात आलेल्या विजयशंकर आणि केदार जाधव यांनी निराशा केली. विजय शंकर १४ तर केदार जाधव केवळ ७ धावा करून तंबूत परतले.

१४० धावांवर ४ गडी गमावल्याने दबावात आलेल्या भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताचा अनुभवी फलंदाज महेंद्र सिंह धोनी क्रीजवर दाखल झाला. त्याने कर्णधार विराट कोहली याच्यासोबत संयमी खेळी करत ४० धावांची भागीदारी केली मात्र ३८.२ षटकात संघाची धावसंख्या १८० असताना होल्डरने विराटचा बळी घेत भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले.

प्रमुख फलंदाज बाद झाल्याने धावांची गती कमी झालेली असताना कोहलीनंतर मैदानात उतरलेल्या हार्दिक पांड्याने  सुरुवातीला आपल्या आक्रमक फलंदाजीला आवर घालत धोनीसह संयमी फलंदाजी केली. पांड्या आणि धोनीने १० षटकांच्या भागीदारीमध्ये ७० धावांची भर टाकत संघाची धावसंख्या २५० धावांपर्यंत पोहोचवली. ४८.२ षटकांमध्ये संघाची धावसंख्या २५० असताना पांड्या बाद झाला. त्यानंतर धोनीने अखेरच्या षटकामध्ये २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत १६ धावांची भर घातली. धोनीच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला २६८ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)