नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार गेले काही दिवस एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या खेळ्या करीत आहे.
त्यातून पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनाही मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. खुद्द सुवेंदु अधिकारी यांच्यावर नुकताच चोरीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी मदत सामग्री हडप केल्याच्या कारणावरून सुवेंदु यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आपल्या दिल्ली भेटीत ते पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा, पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर ट्विटरवर माहिती देताना अधिकारी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालसाठी आपण कायमच उपलब्ध राहू अशी ग्वाही अमित शहा यांनी या बैठकीत आपल्याला दिली आहे