कोलकाता – पक्षांतर्गत कुरबुरीमुळे तृणमुल कॉंग्रेस सोडण्याचे संकेत देणाऱ्या पक्षाच्या खासदार अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी हा निर्णय आयत्यावेळी मागे घेतल्यानंतर आज त्यांना तृणमुल कॉंग्रेसच्या पश्चिम बंगाल शाखेचे उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
या निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केले असून राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आपण अतोनात कष्ट घेऊ असे शताब्दी रॉय यांनी म्हटले आहे. वीरभूम लोकसभा मतदार संघातून त्या तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांचे पक्षाच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्षांशी मतभेद होते. आपल्याच मतदार संघातील पक्षाच्या कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण दिले जात नसल्याची तक्रार करून त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. पण त्यांचे मन वळवण्यात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना यश आले आणि त्यांनी काल पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेतला होता.