प.बंगाल | निवडणुकीच्या निकालानंतर रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली, दि. 4 – प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टीशी दोन हात करण्याकरता कशी तयारी केली त्याचा उल्लेख करताना त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस जागे व्हायचे आणि आपण निवडणूक जिंकू या भ्रमात राहायचे असे आता होऊ शकत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेस पक्षांतर्गतही चलबिचल वाढली आहे. हे निकाल पुन्हा एकदा जागे करणारे आहेत. मात्र, लवकरच या जागे होण्याच्या प्रक्रियेलाही खूप उशीर झाला असेल, अशी बोलकी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्याच वर्तुळात उमटते आहे.

पक्षसंघटनेत महत्त्वाच्या पदांवर सक्षम आणि विश्‍वासार्ह लोकांना बसवण्याची गरज आहे. केवळ राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक घेणे आता पुरेसे ठरणार नाही, असे पक्षातील काही सूत्रांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.
यासंदर्भात पक्षाच्या अत्यंत तरुण प्रवक्‍त्या रागिणी नायक यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवातच आपण आनंद मानत बसणार असू तर आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यास आपल्याला केव्हा वेळ मिळणार असा सवाल त्यांनी केला आहे.

आसाम आणि केरळमधील पराभवाबद्दलही पक्षात कुजबूज सुरू झाली आहे. पक्षसंघटनेत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्‍तींकडे बोट दाखवले जाऊ शकते, त्यामुळेच या दोन राज्यांतील पराभवाची चर्चाही केली जात नसल्याचे त्यातून सूचित करण्यात आले आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद करत एक नेता म्हणाला की, पक्षसंघटनेत व्यापक बदल करण्याची मागणी आता लवकरच उपस्थित केली जाऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.