West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला दोनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून ममता दीदींचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत ममता दीदींचे अभिनंदन केले आहे.
“तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.
देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची घोषणा आज होत आहे. यातील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेस सध्या २०७ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडी प्राप्त करु शकला आहे.
दरम्यान, या चुरशीच्या लढतीत ममता दीदींनी भाजपला पराभूत केल्याने त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.