कोलकाता – भारतीय जनता पक्षाने तृणमूल कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी सुरू केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसनेही भाजपला तशाच पद्धतीने उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता खान यांनी आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
सौमित्र खान यांना लोकसभेवर निवडून आणण्याचे सारे श्रेय त्यांच्या पत्नी सुजाता यांच्याकडेच जाते. त्यामुळे त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसमधील प्रवेशाला विशेष महत्त्व दिले जात आहे. सन 2019 च्या निवडणुकीत सौमित्र खान यांना न्यायालयाने त्यांच्या मतदारसंघातील प्रवेशला बंदी घातली होती. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची सारी धुरा सुजाता यांनीच सांभाळली होती.
मला आत्मसन्मान हवा आहे आणि मला मोकळा श्वास घ्यायचा आहे त्यामुळे मी आता श्रद्धेय दीदींबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुजाता यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार सौमित्र खान पाठवणार घटस्फोटाची नोटीस –
सुजाता मंडल यांनी टीएमसीत प्रवेश केल्याने पती भाजपा खासदार सौमित्र खान नाराज झाले आहेत. त्यांनी पत्नी सुजाता मंडल यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. सौमित्र खान आणि सुजाता यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पडद्यामागे सुरू असलेली लढाई आता पुढे आली असल्याचेही बोलले जात आहे.