पश्चिम बंगाल येथे चौथीत शिकणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून तिची हत्या केल्याचा राक्षसी प्रकार घडला होता. या प्रकरणातील १९ वर्षीय लिंगपिसाट आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे मानत कुलतळी येथील विशेष न्यायालयाने हा निकाल दिला. अत्यंत जलद गतीने झालेला तपास आणि त्यानंतर खटला पूर्ण होऊन गुन्हा घडल्यानंतर ६१ दिवसांमध्ये आरोपीला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे आता स्वागत करण्यात येत आहे.
इयत्ता चौथीमध्ये शिकणारी ही १० वर्षांची चिमुकली ५ ऑक्टोबर रोजी गायब झाली होती. यानंतर या चिमुकलीचा मृतदेह जयनगरमधील एका तलावात आढळून आला. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्यात आला.
जलद न्यायालयीन प्रक्रिया
आरोपीविरोधात ३० ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले, आणि ५ नोव्हेंबर रोजी सुनावणी सुरू झाली. अवघ्या २१ दिवसांत खटला पूर्ण होऊन निकाल देण्यात आला. विशेष जिल्हा न्यायाधीश सुभ्रता चट्टोपाध्याय यांनी आरोपीस भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO Act) दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या…
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निकालाचे स्वागत करताना पोलिस प्रशासन व न्यायसंस्थेचे अभिनंदन केले. “फक्त दोन महिन्यांत अशी शिक्षा सुनावली जाणे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. महिलांवरील अत्याचारांसाठी राज्य सरकार झिरो टॉलरन्सची भूमिका घेत आहे,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना अपराजिता बलात्कारविरोधी विधेयक देशभरात लागू करण्याची गरज असल्याचे म्हंटले. “कठोर कायद्याशिवाय असे गुन्हे थांबवता येणार नाहीत,” असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
पीडित कुटुंबाची प्रतिक्रिया
न्यायालयाच्या निकालानंतर मुलीच्या वडिलांनी समाधान व्यक्त करत, “आम्हाला न्याय मिळाला आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा होती,” असे सांगितले.
स्थानिकांमध्ये संताप व प्रक्षोभ
चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हिंसक निदर्शने केली होती. रस्ते अडवून वाहनांची तोडफोड तसेच पोलिस ठाण्यावरही हल्ला करण्यात आला होता.
दरम्यान, हा निकाल राज्यातील न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारा ठरला आहे, असे विशेष सरकारी वकील विभास चटर्जी यांनी म्हटले.