आखातातील हल्ल्यानंतर पश्‍चिम आशियात तणाव

कच्च्या तेलाच्या दरात वाढ: टॅंकर पेटविण्यात हात नसल्याचा इराणचा दावा

सेऊल- ओमानच्या आखातात तेल टॅंकरवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पश्‍चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. सेच कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. तेलाच्या किमती 4.5 टक्के वाढल्याने तेल कंपन्यांच्या शेअरचे भावही वधारले. तसेच अमेरिकेने व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिल्याने ही दरात वाढ झाली आहे.

ओमानचे आखात हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला असून तेल वाहतुकीचा तो एक प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने दररोज सुमारे 15 दशलक्ष पिंप तेलाची वाहतूक होत असते. ओमानच्या आखातात दोन तेल टॅंकरवर करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचाच हात आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. इराण व अमेरिका यांच्यात संघर्ष वाढत असतानाच तेल टॅंकरवर हल्ल्याच्या घटना झाल्या. या घटनांची अमेरिकेने तपासणी केली असून ओमानच्या आखातात तेल टॅंकरवर करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचा हात आहे यात शंका नाही.

पश्‍चिम टेक्‍सासमध्ये तेलाचे भाव 2.2 टक्के वाढले आहेत. तर तेल टॅंकरवरील हल्ल्यांमुळे तेलाच्या किमती वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, असे ब्रिटनच्या अल्फा एनर्जीचे अध्यक्ष जॉन हॉल यांनी सांगितले. युरेशिया समूहाने म्हटले आहे, की आखातातील तेल वाहतूक धोक्‍यात आणण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. वॉल स्ट्रीट येथे पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.

दरम्यान, ओमानच्या आखातात दोन तेल टॅंकर पेटवून दिल्याच्या घटनेत इराण सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप निराधार आहे, असे इराणने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.