हुआवे – करोना विषाणूच्या प्रसारास अनेक देशांनी चीनला जबाबदार धरले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळेही चीनमधील आघाडीच्या काही कंपन्यांवर विपरीत परिणाम झाला होता. यानंतर आता हुआवेचे धाबे दणाणले आहेत. युरोपमध्ये आपले अस्थित्व टिकून राहावे यासाठी कंपनीने आपण चिनची कंपनी नसून फ्रान्सची कंपनी असल्याची जाहिरातबाजी करण्यास सुरूवात केली आहे.
हुआवेने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरातीची सर्वत्र चर्चा होत आहे. यात त्यांनी चीनची कंपनी नसल्याचा दावा केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच युरोपमध्ये कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच युरोपसाठी 5-जी सेवांची उपकरणं युरोपमध्येच तयार केली जातील, असा दावा युरोपमधील हुआवेचे वरिष्ठ अधिकारी अब्राहम लिऊ यांनी केला होता. परंतु युरोपीयन देशांमधील सरकार हुआवेच्या पब्लिक रिलेशन कॅम्पेनला अधिक महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. एकामागून एक देश त्यांच्यासोबत करण्यात आलेला 5 जीसाठीचा करार संपुष्टात आणत आहेत.
अमेरिकेने हुआवेवर चीनच्या कम्युनिस्ट पक्षासाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच यानंतर ब्रिटननेही कंपनीवर बंदी घातली होती. गुगलनेदेखील त्यांच्यावर बंदी घातली असून त्यांच्या मोबाईल फोनसाठी तांत्रिक सहाय्य देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारतासह काही देशांनी हुआवेकडून तंत्रज्ञान घेण्यास नकार दिला आहे.