लखनौ : विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तर कधी कधी केवळ संशयावरून अनेकजन आपल्या साथीदाराला संपवायला निघतात. लखनौमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील एका पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तिच्या कथित प्रियकाराला संपविण्याची योजना पतीने बनवली. मात्र त्यालाच आपला जीव गमवावा लागला.
पतीने आपल्या पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी मांत्रिकाचा आधार घेतला. मात्र मांत्रिकाच्या भेटीवेळी तिथे ओळख झालेल्या एका व्यक्तीनेच या पतीची हत्या केली. नीरज दीक्षित असे या प्रकारात प्राण गमवावे लागलेल्या पतीचे नाव आहे.
नीरज आपल्या पत्नीच्या प्रियकाराचा काटा मांत्रिकाच्या मदतीने काढण्यासाठी प्रयत्नीशील होता. त्यासाठी त्याच एका मांत्रिकाकडे येणं-जाणं होतं. तिथेच त्याची ओळख शैलेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत झाली. दोघांची मैत्रीही झाली.
मांत्रिक पूजा करुन पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल, असं सांगून शैलेंद्रने नीरजकडून 75 हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून काहीच न घडल्यामुळे नीरजने शैलेंद्रकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान शैलेंद्रने नीरजला दुसऱ्या मांत्रिकाकडे जाण्याचं सुचवलं. नीरज देखील पत्नीच्या प्रियकरापासून सुटका मिळविम्यासाठी हतबल होता. मात्र शैलेंद्रच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने आपले साथीदार धर्मेंद्र आणि श्यामू यांच्या साथीने नीरजची हत्या केली.
17 ऑगस्टला हमीरपूरच्या जंगलात नीरजचा मृतदेह सापडला होता. त्याची बाईकही जाळण्यात आली होती. पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र यांना अटक केली. कॉल डिटेल्समुळे या घटनेचा पर्दाफाश झाला.