पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव घराबाहेर पडता येईना… घरामध्ये अपुरे साहित्य… जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचेनात… घरात केवळ ज्येष्ठ नागरिक… मदतीसाठी परिवारही बरोबर नाही… आजारी असणाऱ्यांना रुग्णालयापर्यंत नेण्याची व्यवस्था उपलब्ध नाही… परिवार आणि वयोवृद्ध नागरिकांना एकमेकांपर्यंत पोहोचता येईना… आदी अडचणी ज्येष्ठ नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. याच अडचणींच्या काळात पोलिसांची “काठी’ ज्येष्ठांसाठी आधार बनली आहे. शहरातील सुमारे 300 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना मदत केली असून, त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
पुणे शहर पूर्वी वाडा संस्कृती, एकत्र कुटुंबे आदीसाठी ओळखले जात होते. पुढे उंच इमारती झालेल्या वाड्याच्या अंगणात खेळलेली मुले विविध संधीमुळे परदेशात, मोठ्या शहरात गेली. तर काही अन्य कारणाने दूर राहू लागले आदी बदलांना सामोरे जात घरात केवळ ज्येष्ठ नागरिक उरले. सध्याच्या करोनाच्या कठीण प्रसंगातही परिवार सोबत नसल्याने मदत कोणाकडे मागायची, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडत होता. यातून मार्ग काढण्यासाठी पुणे पोलिसांचा ज्येष्ठ नागरिक कक्ष मदतीसाठी पुढे आला आहे.
संचारबंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या 1090 आणि 020 26111103 या क्रमांकावर तब्बल ज्येष्ठ नागरिकांचे 322 फोन आले आहेत. सर्व गरजू ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कक्षाने पोलीस स्टेशन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मदत पुरवण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी आणि काय करू नये, याबाबतच्या सूचनांचे माहिती पत्रक आणि क्लिप मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसारित केली आहे.
याशिवाय शहरातील 190 ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक रहिवासी संकुलांचे व्यवस्थापकांच्या व्हाटस्ऍप ग्रुपद्वारे संपर्कात राहून त्यांना आरोग्य विषयक, संचार बंदीच्या संदर्भात, शासकीय सूचना याची माहिती देण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे, अडसूळ, कांबळे, महिला पोलीस हवालदार स्वामी, गायकवाड, चाबूकस्वार, पोना बारसकर, सोनवलकर, मपोशि गलांडे यांचे पथक ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून येत आहे.
कक्षाकडून आरोग्याची काळजी
शहरात एकट्या राहणाऱ्या सुमारे 621, कुटुंबाबरोबर राहणाऱ्या 3 हजार 160 ज्येष्ठ नागरिकांना आणि शहरातील 26 वृद्धाश्रमांना ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन क्रमांकावरून फोन करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत आणि काही अडचण आल्यास ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क करण्याबाबत सांगण्यात येत आहे. कुटुंबासमवेत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील नियमितपणे संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना मानसिक ताणतणाव असल्यास त्यांच्या समुपदेशनासाठी विविध संस्थांमधील डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञ ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात आहेत.
===============