Pune Gramin : जांबूत-पिंपरखेड रस्त्यावरील विहिरींचा जीवघेणा धोका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

जांबूत : पुणे जिल्ह्यातील जांबूत (ता. शिरूर) ते पिंपरखेड मार्गावरील गायमुख-मंचर-शिक्रापूर रस्त्याचे विस्तारीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः गाजरेझाप परिसरात रस्त्याच्या वळणावरील साईडपट्टीजवळ असलेल्या विहिरी अपघातांना निमंत्रण देत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या या रस्त्यावर एकमार्गी वाहतूक सुरू असून, साईडपट्टी भरण्यासाठी मुरूमचा वापर करण्यात आला आहे. मात्र, हा मुरूम पक्का नसल्याने पावसाळ्यात साईडपट्टीवर चिखल होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहने घसरण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरील मोठ्या वळणामुळे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे वाहनचालकांना साईडपट्टी आणि विहिरीचा अंदाज येणे कठीण होते. सध्या विहिरींलगत तात्पुरत्या स्वरूपात हलके पाइप आणि कापडी-प्लास्टिक पट्ट्या लावण्यात आल्या आहेत, परंतु हे उपाय अपुरे आणि अप्रभावी ठरत आहेत.
यापूर्वी या परिसरात विहिरींमध्ये वाहने कोसळून अनेक अपघात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भक्कम लोखंडी जाळ्या किंवा रस्त्यालगत मजबूत संरक्षक भिंती उभारण्याची मागणी केली आहे. रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीच्या असुरक्षिततेमुळे अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
पावसाळ्याच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पावले उचलून रस्त्याच्या साईडपट्टीचे बांधकाम मजबूत करावे, सूचना फलक लावावेत आणि विहिरींवर संरक्षक जाळ्या किंवा भिंती उभाराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.





