मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना या निकालाचा मोठा धक्का बसल्याच दिसून आलं आहे.
दरम्यान, आता शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करताना दिसत आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. काही दिवसांपूर्वीच (दि. 5 मार्च) उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
उद्धव ठाकरेंची कोकणातील सभा झाल्यानंतर त्यांची दुसरी सभा कुठे होणार? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच त्यांच्या आगामी सभेचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची 26 मार्च ला मालेगाव येथे सांयकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार असून, या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
या व्हिडओमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या काही ओळी आहेत. ‘बरं झाले गद्दार गेले.. आणि हिरे सापडले.., अद्वय केवळ मालेगाव नाही तर पुरा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला बघायचा आहे. म्हटलं होत मालेगावला सभा घेतो जे काय बोलायचं ते मोकळ्या मैदानात बोलायचं काय असेल ते मैदानात..’ असं या टिझर मध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या या सभेचा टिझर चांगलाच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.