बरं झालं… पुणे मागे पडलं

Madhuvan

देशात दिल्ली आणि बंगळुरू शहरात आता सर्वाधिक करोनाबाधित


महापालिकेला काहीसा दिलासा : मुंबईचा वेगही मंदावला

पुणे – देशात करोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल 73 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आतापर्यंत बाधित सापडण्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन शहरे आघाडीवर होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून दिल्ली आणि बंगळुरूने पुण्याला मागे टाकत आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये दररोज सापडणाऱ्या बाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे. तर, कर्नाटक, बंगळुरू याठिकाणी सर्वाधिक बाधित सापडत आहे. त्यावरून मुंबई आणि पुण्यातील बाधितांचा वेग मंदावला असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

देशात करोनाचा पहिला बाधित 30 जानेवारीला सापडला. जवळपास नऊ महिन्यात भारतातील करोनाबाधितांचा आकडा 73 लाखांच्या वर गेला असून आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सध्या, देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यात करोनाचा अधिक प्रसार होताना दिसत आहे. दरम्यान, सुरुवातीला महाराष्ट्रात करोनाचा कहर दिसून आला. मात्र, आता मुंबई आणि पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. पुण्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करोनाचा प्रसार वेगाने वाढला होता. राज्यात प्रतिदिन सर्वाधिक पुण्यात नवीन करोना रुग्णांचे निदान होत होते.

मात्र, आता या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली आहे. मागील 24 तासांत देशात करोनाच्या 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्याने 63 हजार 371 बाधित सापडले आहे. त्यामुळे देशातील करोना बाधा झालेल्यांची संख्या 73 लाख 70 हजार 469 झाली आहे.

पुण्यानंतर बंगळुरूमध्ये करोनाचा कहर…
पुणे शहरानंतर आता दिल्लीसह बंगळुरू शहरात करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याचे जाणवते. या आठवड्यात बंगळुरूमध्ये प्रतिदिन पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत आतापर्यंत प्रतिदिन साडेचार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान झाले आहे. बंगळुरूसह इतर शहरांतील वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे कर्नाटक हे केरळनंतर करोना रुग्ण आकडेवारी वाढीच्या दरात दुसऱ्या स्थानी पोहोचले आहे. मागील तीन आठवड्यांपासून कर्नाटकात 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे.

दिल्लीने पुण्याला टाकले मागे…
शहरांचा विचार केला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुण्यात प्रतिदिन तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. मात्र, आता ही संख्या तब्बल दीड हजारांपेक्षा खाली आली आहे. तर एकूण बाधितांची संख्या तीन लाख इतकी आहे. आता दिल्लीने करोनाच्या आकडेवारीत पुण्याला मागे टाकले आहे. सध्या, दिल्लीत प्रतिदिन तीन हजारांपेक्षा जास्त बाधित सापडत आहे. गुरुवारी (दि. 15) दिल्लीत जवळपास 3 हजार 500 बाधित सापडले. तर आतापर्यंत तीन लाख 20 हजारपेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.