रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन होणार- मुख्यमंत्री

अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरात भरारीपथक नेमणार

मुंबई – रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबतचा आदेश तातडीने काढण्यात येईल. रिक्षाचालकांच्या विविध योजनांबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. त्यात सरकारी अधिका-यांसोबतच रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल.अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक शहरात तातडीने भरारीपथकांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शशांक राव यांनी दिली.

विविध मागण्यांबाबत रिक्षाचालकांनी मंगळवारी संपावर जाण्याची हाक दिली होती .मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालक संघटनेला चर्चेला बोलाविल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मंगळवारी मंत्रालयात रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्‍त कृती समिती महाराष्ट्र या संघटनेला चर्चेला बोलाविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शशांक राव यांनी पत्रकारांना माहिती दिली. रिक्षाचालकांचा संप आधीच मागे घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आपण समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय येत्या दहा दिवसांत निघणार असल्याचे सांगून शशांक राव म्हणाले, राज्यातील अवैध वाहतुकीचा फटका सगळयांनाच बसतो. एकट्या मुंबईत 30 हजार अवैध रिक्षा आहेत. रिक्षा, खासगी प्रवासी वाहने या अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. तसेच हकिम समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढीसाठी ग्राहक निर्देशांकात झालेल्या वाढीनुसार रिक्षा भाडेवाढीचे सूत्र ठरविण्यात यावे ही आमची मागणी आहे. ग्राहकनिर्देशांकात जर वाढ झाली असेल तर भाडेवाढ करावी इतकी सरळ आमची मागणी आहे, असे राव म्हणाले.

मुक्त परवाने बंद करा!

रिक्षांचे मुक्‍त परवाने ताबडतोब बंद करण्यात यावे. कारण सरसकट मुक्‍त परवाने देण्यात आल्याने रिक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. जेव्हा भविष्यात आवश्‍यकता वाढेल तेव्हा त्यांचे वाटप पुन्हा सुरू करावे या आमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखविल्याचेही शशांक राव म्हणाले. ओला-उबेरवर बंधने आणण्याची मागणी आपण केली, पण सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले.

प्रवाशांसोबत दुर्व्यवहारासाठी अवैध रिक्षावालेच जास्त प्रमाणात कारणीभूत असतात. अशा अवैध रिक्षाचालकांविरोधात आम्ही वेळोवेळी तक्रारी करत असतो, मात्र प्रशासन त्याची दखल घेत नसल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.