श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – आधुनिक शेती शिवाय गत्यंतर नाही, हा विचार घेऊन सतत नवनवीन प्रयोग राबविणाऱ्या येथील हरहुन्नरी वेल्डर नानासाहेब शिंदे यांनी मिनी टिलर बनविला आहे. लॉकडाऊनच्या काळात इंजिनिअर मुलगा सूरज यांच्या मदतीने हा टिलर शेतात बैलांची जागा घेणार आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कृषी मंडल अधिकारी शीतल अरू यांच्या उपस्थितीत याचे प्रात्यक्षिक झाले असून, शिंदे यांच्या आधुनिक कल्पतेचे त्यांनी कौतुक केले.
या मिनी पॉवर टिलर ट्रॅक्टरची वैशिष्ट्य म्हणजे एका बैलाच्या किमतीमध्ये तो उपलब्ध होतो आहे. शेतकऱ्यांकडे बैल राहिलेले नाहीत. दोन बैल जे काम करतात, तेच काम हा मिनी पॉवर टिलर करणार आहे. या ट्रॅक्टरपासून काकऱ्या, तीन फणी मारणे, पाळी मारणे, सारे काढणे, पेरणी करणे, पाण्याचा पंप चालवणे, फवारणी करणे आदी कामे सफाईदारपणे केली जातात. लॉकडाऊनच्या काळात घरी अराम न करता शिंदे बाप-लेकांनी ही किमया साधली आहे. मेहेत्रे यांच्या शेतात प्रात्यक्षिक करताना अरू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, कृषी अधिकारी डी. एन. मुळे, जयदीप शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, अरविंद कापसे, माजी सरपंच सुरेश शेंडगे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी आणखी नवीन तंत्रज्ञान बनविणार
काही दिवसांपूर्वीच आधुनिक कांदा चाळीचे लोकार्पण केले. कृषी विद्यापीठाने याची दखल घेतली. तत्पूर्वी चांदीचा रथ, बोअरवेल गाड्यांवर फिरता एक बीएचके फ्लॅट बनविला होता. आता शेतकऱ्यांना संकट काळात आधार होईल, असे अद्ययावत उपकरणे बनविण्याचा संकल्प आहे.
नानासाहेब शिंदे,श्रीगोंदा