शाळांत झाले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; चिमुकल्यांची रडारड आणि ओठांवर हसूही

पुणे – उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या असून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करुन गुलाबपुष्प, खाऊ वाटप करण्याबरोबर विविध उपक्रम राबवून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मोफत पुस्तके वाटपास सुरुवातही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या आहेत. तर, पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या बच्चेकंपनीला मात्र रडू आवरले नाही.

जिल्हा परिषद शाळाही गजबजल्या
पुणे जिल्हा परिषदेच्या 3 हजार 675 शाळा आहेत. या शाळांमध्येही आंनदाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी स्वत: काही शाळांना भेटी देवून पाहणी केली आहे, असे प्राथमिकचे शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार यांनी सांगितले आहे.

माळा, पताका आणि झुरमुळ्यासुद्धा…
तब्बल दीड-दोन महिन्यांच्या कालावधीनंतर विद्यार्थी सोमवारी पुन्हा शाळेत दाखल झाले. रिक्षा, बस, व्हॅनमधून बहुसंख्य विद्यार्थी शाळेत आले. काही पालकांनी स्वत:च मुलांना शाळेत घेऊन जाण्याला प्राधान्य दिले. नवीन गणवेश, नवीन स्कूल बॅगसह शाळेत त्यांचे आगमन झाले. बहुसंख्य शाळांमध्ये पायघड्या, रांगोळ्या, फुगे, फुलांचा माळा, पताका, झुरमुळ्या लावून शाळा सजविण्यात आल्या होत्या. सनई-चौघड्यांचा गजर व बालगीतांच्या सुमधूर धूनमुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पेढे, मिठाई, चॉकलेट भरवून विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यात आला. शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांनी आपआपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पालिका शाळांतून पुस्तकांचे वाटप
महापालिकेच्या 277 प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. शाळांची स्वच्छतांची कामे आधीच पूर्ण करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये आगमन होत्याच त्यांचे शाळांमधील शिक्षक, शाळा समितीचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्या हस्ते औक्षण करुन त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकांचे वाटपही करण्यात येऊ लागले आहे. सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्या त्या भागातील शाळांना भेटी देत त्यांचे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
विविध खेळांचे आयोज

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी चांगलेच रमल्याचे दिसून आले.

नूमवि प्रशालेत डोरेमॉनच्या हस्ते खाऊ वाटप
नूमवि मुलींच्या प्रशालेत इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनीचे स्वागत करण्यात आले. बॅंड पथक सज्ज ठेवण्यात आले होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत विद्यार्थीनींना प्रेरित केले. त्यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. डोरेमॉनच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष केशव वझे, मुख्याध्यापिका नेहा पेंढारकर, उपमुख्याध्यापिका गीता साने, पर्यवेक्षिका संगीता कांबळे आदी उपस्थित होते.

रानडे बालक मंदिरात “जंगल थीम’
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी “जंगल थीम’वर आधारावर वर्गखोल्यांची सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापिका रुचा जोशी यांच्यासह इतर शिक्षकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

अत्तर लावून औक्षण
डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सुवासिक अत्तर लावून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तर, पहिल्याच दिवशी डब्यातील खाऊ काय, हे पाहण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता.

बालचमूंची रडारड थांबविण्यासाठी शिक्षिकांची धावपळ
शहरातील बऱ्याचशा पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, युकेजी या वर्गांमध्ये बालचमूंचा नव्यानेच प्रवेश करण्यात आला आहे. या बालचमूंना पालकांनी पहिल्या दिवशी शाळेत सोडले. मात्र शाळेच्या भीतीपोटी या बालचमूंनी जोरजोरात रडारडा सुरू केली. वर्गातून बाहेर जाण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांची रडारड थांबविण्यासाठी शिक्षिकांची धावपळ उडाल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये पहायला मिळाले. विविध खेळ देऊन व खाऊचे वाटप करुन या बालचमूंना शांत करण्यासाठी शाळांमध्ये धांदलही उडाली.

पेढा व पेन्सील देत शिक्षणाचा “गोडवा’
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पेढा व पेन्सील देऊन स्वागत करण्यात आले आहे. तर, कोथरुड येथील बाल शिक्षण मंदिरात इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.

बॅंड पथकाचे वादन
अहिल्यादेवी शाळेत बॅंड पथकाच्या वादनाने विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजनानंतर विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले.

तुळशीची रोपे देऊन स्वागत
रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यायाध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या कल्पनेतून “मुक्तागार’हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. यात मातीकाम, रंगकाम, वाचन असे छंद जोपासताना विविध बैठे खेळ खेळता येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाचवीतील विद्यार्थ्यांचे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थीदेखील आनंदून गेले.

हुजुरपागा प्रशालेत तिरंगा आणि गुलाबपुष्प
“विधायक’, पुणेतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजुरपागा प्रशालेत निवृत्त कॅप्टन विदूल दाभाडे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना भारताचा झेंडा व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ऍड. बिपिन पाटोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, गिरीष पोटफोडे, विष्णु ठाकूर, अशोक मेहेंदळे, सुरेश कालेकर, सेवा मित्र मंडळाचे उमेश कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा झोडगे, पर्यवेक्षिका रंजना वाठोरे, पर्यवेक्षिका वसुधा कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका सुधा कांबळे, ज्योती महाजन, सुयोग कांदे, संगीता गोरे, गायत्री साठे आदी उपस्थित होते.

शाळा अध्यक्षांची पुस्तक तुला
टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रतीक देशमुख, आमोघ वैद्य या माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन आणि नाट्यछटा सादर केल्या. नवीन मराठी शाळेत सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची पुस्तक तुला करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त ही पुस्तके भेट म्हणून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.