कार्ला -गेल्या अनेक दिवसांपासून भक्त आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागताची तयारी आणि प्रतीक्षा करत होते. गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. कार्ला, वेहरगाव, दहिवली, शिलाटणा, मळवली, भाजे, पाटण, देवले, वाकसई, बोरज, टाकवे या ठिकाणी उत्साहात ढोल-ताशांचा दणदणाट, तर काही भागात टाळ-मृदंगांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले.
सकाळपासूनच घरगुती गणपतींच्या आगमनाला सुरुवात झाली. घरातील छोटी मंडळीने ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’चा जयजयकार करत गणपतीचे स्वागत केले.
घरातील गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर कार्ला गावातील “एक गाव एक गणपती’ या उपक्रमानुसार गावातील मारुती मंदिरात सकाळी साडेअकरा वाजता “गणपती बाप्पा मोरया’ जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
तसेच कार्ला येथील संत रोहिदास तरुण मंडळाच्या गणपतीचे टाळ-मृदुगांच्या गजरात स्वागत करण्यात आले.