नववर्षाचे स्वागत असे करा !

अशोक वाळिंबे, सातारा

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी साजरी करण्याच्या पध्दतीबाबत असंतोष सतत प्रगट होत असे. मोठ्या प्रमाणावर टीका करण्यापेक्षा आपण भारतीय नववर्षाचे स्वागत चांगल्या प्रकारे आणि सुजाण नाग रिकांना सोबत घेऊन भव्य प्रमाणावर साजरे करण्याची संकल्पना भारतीय नववर्ष गुढी पाडवा ह्या दिवसाला (चैत्र शुध्द प्रतिपदा) वेगळी चांगली पार्श्‍वभूमी आहे. एकतर वसंताचे आगमन म्हणजे निसर्गाचे वरदान, पर्यावरण आणि अल्हाददायक हवामानामुळे उल्हास लोकांच्या मनात दाटलेला असतो. धार्मिक दृष्ट्या श्री राम विजय प्राप्त करून अयोध्येतील आगमन हे विजयाचे आणि आनंदाचे पर्व मानले गेले आहे. भारतीयांच्या मनामनातील सुप्त इच्छा-आकांक्षाचे सामुहिक प्रगटीकरण, ह्या यात्रेच्या माध्यमातून केले गेले. धार्मिक पार्श्‍वभूमी असली तरी मुख्यतः सामाजिक सौहार्दाचा आशय महत्वाचा होता.

सगळ्या नगराने, गावाने एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव असल्यामुळे आबालवृध्द स्त्री पुरूषांबरोबर सामाजिक संस्थाचा सहभाग लक्षणीय ठरला. सुरूवातीच्याच वर्षी डोंबिवलीच्या श्रीगणेश मंदिराने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहराच्या स्वच्छतेत आणि सजवण्यात सर्वांचा सहभाग लाभला. विशेषतः महिलांच्या शहरभर रेखाटलेल्या रंगीबेरंगी नयन मनोहर भव्य रांगोळ्यांनी उत्तम वातावरण निर्मिती झाली. पाडव्याच्या दिवशी सकाळी निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत पन्नास हजारांवर नागरिकांचा आणि वस्त्राअलंकारांनी नटलेल्या महिला वर्गाचा सहभाग होता. त्याचबरोबर सुमारे शंभर सामाजिक संस्थाच्या आकर्षक चित्ररथांमुळे ही यात्रा आपोआपच शोभयात्रा झाली. सहभागींनी उत्साहाबरोबरच स्वयं सामुहिक शिस्त जपल्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला.

डोंबिवलीत निघालेल्या पहिल्या नववर्ष स्वागत यात्रेला पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी उत्तम प्रसिध्दी दिल्याने सगळ्या महाराष्ट्रभर योग्य संदेश गेला आणि पुढील वर्षी अनेक शहरांनी यात्रा आयोजित केल्या आणि त्या त्या ठिकाणच्या सुजाण नागरिकांनी या यात्रे अंतर्गत अनेक उपक्रम राबवून आणि तरूण वर्गाने नव्या यंत्रज्ञानाचा अवलंब करून या ज्ञानातील वैविध्य जपले. एक सुत्र सुरूवातीपासूनच सांभाळले ते म्हणजे स्थानिक यात्रा तेथील मंडळीनीच आपल्या संकल्पना राबवून वारकरी मंडळीप्रमाणे स्वयं नियंत्रित आणि यशस्वी कराव्यात. अन्य कोणत्याही ठिकाणाहून त्यांना उपक्रमाबाबत निर्देश करू नयेत. अशा प्रकारची कोणतीही मध्यवर्ती संस्था नसावी.

मागितल्यास आवश्‍यक तो सल्ला द्यावा, चर्चा करावी. राजकीय पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आपल्या उपस्थितीने सहभाग द्यावा पण यात्रेचे नेतृत्व शक्‍य तो समाज धुरीणांनी करावे. या यात्रेच्या निमित्ताने कल्पकतेने आणि आवश्‍यकेनुसार अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळग्रस्तांना मदत, समाजातील आ र्थिक दुर्बलांना सहाय्य, कुठे पाणवठ्यांचे पाण्याच्या श्रोतांचे निर्माण, आनंदवनातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक महत्वाचा उल्लेख म्हणजे या यात्रेला कोणी गॉडफादर नाही, प्रायोजक नसावा. सामाजिक संस्था आपल्या खर्चाचा वाटा स्वयंस्फूर्तीने स्वतःच उचलतात. या यात्रांमुळे काही उद्योगांनाही चालना मिळाल्याची उदाहरणे आहेत. भारतीय नववर्ष स्वागत यात्रा हे या दिशेने टाकलेले एक स्वयंस्फूर्त सकारात्मक पाऊल ठरावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.