सहकारनगर, दि. 27 (प्रतिनिधी) – घरी गौराई, नवरात्रोत्सवाचे स्वागत करतो त्याचप्रकारे गर्भात वाढणाऱ्याया मुलीचेही स्वागत करा, असे आवाहन करीत ज्याना वंशाला दिवा हवा आहे, त्यांनी शरद पवारांचा आदर्श घेत मुलगा आणि मुलगी समान माना, असा सल्ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला.
श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटरच्या वतीने स्व. प्रतिभा संतोष भुरट यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील महिलांना आदिशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी चाकणकर बोलत होत्या. याप्रसंगी महापालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम, संस्थापक सतीश बनवट, अध्यक्ष ललित जैन, हेमंत भंडारी, आरती जैन, अरुणा बनवट, नूतन गुपचूप, गौतम गेलडा, संतोष भुरट, वैभव सेठीया, राजेश ललवाणी, राहूल ललवाणी, मुकुल बरमेचा आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पा कटारिया, पूजा लोढा, कल्पना वरपे, स्वाती डिंबळे, वैशाली तूपुरे यांना आदिशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. चाकणकर म्हणाल्या की, सामाजिक संस्था जे काही चांगले काम करतात त्यांच्याच माध्यमातून जग चालते. सूत्रसंचालन दिनेश मुनोत तर ललित जैन यांनी आभार मानले.