स्वागत उन्हाळ्याचे…

पूर्वी वर्गात बाई पाठ करून घ्यायच्या-एकूण ऋतू किती? “3! कोणते?’ “हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा.’ आणि मग त्याचे महिनेही. हमखास परीक्षेत येणारा 10 मार्काचा प्रश्‍न. आता इतकी वर्षे झाली त्याला, पण ऋतुचक्र काही थांबत नाही. पर्यावरणाच्या हानीमुळे आता मात्र थोडे महिने बदलले आहेत आणि हिवाळ्याची काय किंवा उन्हाळ्याची तीव्रता नक्कीच वाढली आहे. पूर्वी वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी असेल तेव्हा थंडी असा ढोबळ विश्‍वास होता.

आईने माळ्यावरून माठ काढला आणि तो उन्हात ठेवला की उन्हाळ्याची चाहूल लागे. परीक्षेचा अभ्यास घेता घेता ती बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या, उडदाचे पापड इ. तयारी करू लागे. नात्यात कोणाचे तरी लग्नकार्य असेल तर खूपच मजा येत असे आणि बहुतेक एक-दोन कार्ये तरी असतच. त्यामुळे आम्हा लहान मुलामुलींची खाण्याची, खेळण्याची आणि मिरविण्याची हौस पुरी होत असे.

आता उन्हाळा जाणवू लागतो तोच मुळी टी.व्हीवर फ्रीज, कुलर, ए.सी.च्या जाहिराती सुरू झाल्या की, आणि त्याचबरोबर एखादी मेकअप केलेली आई मुलांसाठी सरबताचे ग्लास घेऊन येताना दिसली की समजावे, उन्हाळा येऊ घातला आहे. बाजारात कैऱ्यांची आवक होऊ लागते. फणसाचा वास घमघमू लागतो. मोगऱ्याचे गजरेवाले सिग्नलला थांबल्यावर आठवण करून देतात त्या धुंद वासाची, आणि नकळत आपण क्षणभर तरी गाडी थांबवतोच. क्वचित कोणाकडे चैत्रगौरीचे हळदी कुंकू असते. कैरीची डाळ, पन्हे, काकडी, हरबऱ्याची ओटी आणि सुगंधी सोनचाफा किंवा मोगऱ्याचा गजरा भान हरपून टाकतो.

असा सुगंधाने भारलेला उन्हाळा एप्रिल आणि मे मध्ये मात्र अंग भाजून काढतो. डांबराचे रस्ते आग ओकू लागतात. क्षणभर मिळालेली सावली दिलासा देऊ लागते. गाडीवरून जाताना स्कार्फ, गॉगल, हातमोजे अशा सर्व तयारीनिशीच बाहेर पडावे लागते. वाटेत एखादे रसाचे गुऱ्हाळ दिसले तर उसाचा रस पिण्याचा मोह होतोच. बाकी नवनवीन आईस्क्रीम्स, मस्तानीही सेवेला असतातच. एखादी वळवाची सर आली तर त्या तप्तभूमीला मे महिन्यामध्ये थोडासा दिलासा मिळतो. ती मृदगंधाने ती मोहरून जाते.

आता नुकताच सुरू झालेल्या या उन्हाळ्याचे दरवर्षीप्रमाणे स्वागतच करू या त्यामध्ये येणाऱ्या सणांचा आनंद घेऊ यात पदार्थांची रेलचेल अनुभवूया. आंब्याचा, कलिंगडाचा जांभळाचा मनसोक्त आस्वाद घेऊयात. हे ऋतुचक्र असेच अखंड चालू राहणार आहे. नेमेचि येतो उन्हाळा येणारच आहे. किती उकडतंय, केवढं ऊन आहे, किती घाम येतो आहे, बाहेर पडावसंच वाटत नाही असे म्हणत उन्हाळ्याला उगाचंच नावे ठेवत बसू नका. तर त्याचं येणंही साजरं करा आणि हे सृष्टीचक्र आहे अखंड चालणारं- कारण उन्हाळ्यानंतर पावसाळाही ही येणार आहेच जसं प्रत्येक दुःखामागे सुख दडलेलं असतं-आपण फक्त आपली नजर बदलायला हवी.

– आरती मोने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)