स्वागत पुस्तकांचे : वेगळ्या धाटणीची “कांडा’

– विजय शेंडगे

केरळमधील मन्नारकड इथे स्फोटकांनी भरलेला अननस हत्तीणीला खाण्यासाठी देण्यात आला. ती हत्तीण गर्भवती होती. त्या घटनेत तिला आणि तिच्या पिल्लाला जीव गमवावा लागला. या घटनेचे समाजमाध्यमांवर जोरदार प्रतिसाद उमटले. चर्चा झाल्या. परंतु दोषी सापडले नाहीत. वादळ उठावं आणि थंड व्हावं तसं झालं.

सगळ्यांना त्या घटनेचा विसर पडला. परंतु कोमल मनाच्या सुनिताराजे पवार ती घटना विसरू शकल्या नाहीत. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यातून “कांडा’ ही साहित्यकृती जन्माला आली.

कांडा ही कथा, कादंबरी की दीर्घकथा या वर्गीकरणात पडण्याचे कारण नाही. कविता, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, व्यक्‍तिचित्रण, दीर्घकथा असे साहित्याचे वर्गीकरण आपण आपल्या सोयीसाठी केले आहे.

लेखकाने, कथानकाला, भावभावनांच्या चित्रणाला किती न्याय दिला हे अधिक महत्त्वाचे. त्या फुटपट्टीवर कांडाचे मूल्यमापन करायचे म्हटले तर कांडा ही अत्यंत हलकीफुलकी आणि परिपूर्ण म्हणावी अशी साहित्यकृती आहे.

आफ्रिकेच्या जंगलातून एक हत्तीचं पिलूू पकडण्यात आलं. आपल्या आईपासून आणि नैसर्गिक अधिवासापासून दुरवल्यामुळे त्याने पूर्ण असहकार पुकारला. खाणंपिणं सोडून दिलं. पुढील प्रवासात अनेक दिवस प्रेमाचा स्पर्श ना लाभलेल्या त्या पिलाला, बोटीवरील अनाथ मुलाचा प्रेमाचा स्पर्श लाभतो आणि त्या स्पर्शाने ते हत्तीचं पिलू सुखावतं.

स्पर्शाची भाषा, डोळ्यांची भाषा, आवाजातले चढउतार, स्वरातला राग लोभ हा माणसाला कळतोच. परंतु माणसापेक्षा पशुपक्ष्यांना तो अधिक कळतो. हत्तीचं पिलू अनाथ आणि तो मुलगा देखील अनाथ. प्रेमाचा स्पर्श ही दोघांची नैसर्गिक गरज. त्यातून त्या दोघांचे मैत्र जुळते. दृढ होते.

पुढे दोघेही एका देवस्थानच्या सेवेत रूजू होतात. तिथे शिद्दम्मा हा हत्तींचा प्रशिक्षक भेटतो. तो शिद्दम्माच त्या अनाथ हत्तीच्या पिलाच “कांडा’ तर त्या अनाथ मुलाचं “कृष्णा’ असं नामकरण करतो.

पुढे अनेक घटना घडतात. समीक्षकाने, परीक्षकाने, प्रस्तावना लिहिणाऱ्याने साहित्यकृतीच्या कथानकावर फारसे भाष्य न करता त्या साहित्यकृतीतील जाणिवा नेणिवांचा धांडोळा घ्यावा. जाणीवे नेणिवेच्या निकर्षांवर कांडा अत्यंत उत्तम साधली आहे.

साधी सोपी भाषा, गरजेपुरती वर्णनं, आटोपशीर संवाद या सगळ्या गोष्टींमुळे कांडा अत्यंत वाचनीय झाली आहे. माणूस आणि प्राणी यांच्या नातेसंबंधावर एका वेगळ्या कोनातून प्रकाश टाकण्याचा ही साहित्यकृती यशस्वीपणे प्रयत्न करते.

सुनील मांडवे यांची मुखपृष्ठाची मांडणी लक्षवेधी आहे. प्रतीक काटे यांची रेखाचित्रं साहित्यकृतीच्या सौंदर्यात भर घालतात. आशय आणि निर्मिती अशा दोन्ही अंगाने ही साहित्यकृती उत्तम साधली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.